भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भविष्यात रोहित शर्माच्या जागी भारताचा कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत सर्वांत पुढे आहे; पण त्याच्या तंदुरुस्तीचा इतिहास पाहता तो दीर्घकाळासाठी पर्याय ठरू शकत नाही. कमरेच्या मांसपेशी दुखावल्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याचे खेळणे संदिग्ध आहे.
कसोटीत नियमित कर्णधाराची जबाबदारी मिळणार?
भारतीय निवडकर्त्यांना आशा आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो मोलाची भूमिका बजावू शकतो; कारण आतापर्यंत त्याला केवळ सूज आहे; पण प्रश्न हा आहे की, त्याला कसोटीत कायमस्वरूपी कर्णधार म्हणून विचारात घेतले जाऊ शकते का? कारण आता रोहित शर्माचे कसोटी क्रिकेटमधील भविष्य जवळपास निश्चित आहे.
ऋषभ पंत हवा उपकर्णधार
माजी निवडकर्ते देवांग गांधी म्हणाले की, माझ्यासाठी ही सोपी बाब आहे. बुमराहने ४५, तर पंतने ४३ कसोटी सामने खेळले आहे. पंत २७ वर्षांचा असून २३ वर्षी त्याने गाबावर भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. तो सामना जिंकून देणारा आहे; त्यामुळे तोच उपकर्णधार हवा.
उपकर्णधार म्हणून एक मजबूत नाव शोधण्याची गरज
जर बुमराह इंग्लंडमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी तंदुरुस्त आणि तयार असेल तर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना उपकर्णधार म्हणून एक मजबूत नाव शोधण्याची गरज आहे; कारण आपत्कालीन स्थितीत उपकर्णधार जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असायला हवा.