World Record With Last Ball Six Win : आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान महिला संघाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आलीये. दुसरीकडे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आयर्लंड संघाने हातून निसटलेला सामना जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आयर्लंडमधील डब्लिन शहरातील क्लोन्टार्फ क्रिकेट क्लबच्या मैदानात ऑयर्लंड आणि पाकिस्तान महिला संघातील दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. या सामन्यात जेन मॅग्वायर हिने अखेरच्या चेंडूवर षटकार मारत संघाचा विजय साकार केला. तिचा हा मॅच विनिंग सिक्सर विश्व विक्रमी ठरला. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. या सामन्यातील विजयासह आयर्लंड संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक संघानं यजमान आयर्लंडसमोर ठेवलं होतं १६९ धावांचं लक्ष्य
दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानी महिला संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून सलामीची बॅटर शवाल जुल्फिकार हिने २७ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ३३ धावांची सर्वोच्च खेळी केली. कप्तान फातिमा सना आणि एयमान फातिमा या दोघांनी प्रत्येकी २३-२३ धावा केल्या. आयर्लंडकडून गोलंदाजीत कारा मुरे आणि लारा मॅकब्रायड या दोघींनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
शेवटच्या षटकात हव्या होत्या ९ धावा
धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाकडून कर्णधार गेबी लुइस (२१) आणि ओरला प्रेंडरगॅस्ट हिने ३४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या. या दोघींशिवाय लॉरा डेलानी हिने ३४ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. रेबेका स्टोकेलच्या १६ चेंडूतील ३४ धावांच्या खेळीमुळे सामन्यात ट्विस्ट आले अन् शेवटी यजमान आयर्लंड संघाने बाजी मारली. आयर्लंडच्या संघाला अखेरच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती.
ती आली अन् षटकार मारत सामना जिंकून देण्यासोबत वर्ल्ड रेकॉर्ड सेट करून गेली
पाकिस्तानकडून सादिया इक्बाल शेवटचं षटक घेऊन आली. पहिल्या चेंडूवर रेबेकानं एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या Ava Canning हिने एक चेंडू निर्धाव खेळल्यावर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली. २ चेंडूत ४ धावांची गरज असताना ती आउट झाली. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या जेन मॅग्वायर हिने षटकार मारत मैफिल लुटली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारून सामना जिंकूनदेणारे फलंदाज
- पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद या दिग्गजाने १९८६ मध्ये आशिया कप फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला होता.
- दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लुजनर याने १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरस असतानाषटकार मारलाहोता.
- झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर याने २००६ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना षटकार मारला होता.
- कॅरेबियन शिवनारायन चँदरपॉल याने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६ धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता.
- भारताकडून दिनेश कार्तिकनं २०१८ च्या निदास ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये अंतिम चेंडूवर षटकार मारून सामना जिंकून दिला होता.