विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटीतील निवृत्तीची चर्चा रंगत असताना भारताचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने या क्रिकेट प्रकारात मोठा पराक्रम करून दाखवत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. सध्याच्या घडीला रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये व्यग्र आहे. तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसतोय. मग कसोटीत त्याने कसा विक्रम नोंदवला असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. इथं जाणून घेऊयात आयपीएल खेळत असताना जड्डूनं कसोटीत मोठा डाव कसा साधला त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटी क्रमवारीत जडेजा अव्वलस्थानी कायम
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाने अव्वलस्थान कायम राखले आहे. नव्या क्रमवारीत ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत तो अव्वलस्थानावर आहे. यासह सर्वाधिक काळ नंबर वन राहण्याचा खास विक्रम त्याच्या नावे झालाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा ४०० रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी विराजमान आहे.
रोहित-विराटसोबतच्या जुन्या आठवणींसह गब्बरनं शेअर केला मैत्रीचा खास किस्सा
कधीपासून तो नंबर वन स्थानावर आहे माहितीये? रवींद्र जडेजा ९ मार्च २०२२ रोजी वेस्टइंडीजच्या जेसन होल्डरला मागे टाकत कसोटी क्रमवारीतील अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला होता. मागील ३८ महिन्यांपासून जडेजाने आपली बादशाहत कायम ठेवण्यात यश मिळवलीय. २०१७ मध्ये पहिल्यांदा तो कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला होता. पण त्यावेळी फक्त आठवडाभरच तो नंबर वन राहिला. पण आता तब्बल ११५२ दिवस तो आपले अव्वलस्थान टिकवून आहे.
पहिल्या टॉपमध्ये कोण कोण?
कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा पाठोपाठ बांगलादेशचा मेहदी हसन मिराज ३२७ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने मार्को यान्सेन (२९४ रेटिंग पॉइंट्स) याला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून शाकिब अल हसन टॉप ५ मध्ये आहे. जडेजा वगळता अन्य कोणताही भारतीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टॉप १० मध्ये दिसत नाही. अक्षर पटेल १२ व्या स्थानावर दिसतो.