Rohit Sharma T20 Cricket: युएईमध्ये सुरू असलेल्या टी२० तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इटलीनेआयर्लंडला हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. इटालियन क्रिकेट संघाचा पूर्ण सदस्य देशाविरुद्ध हा पहिलाच विजय ठरला. २६ जानेवारी रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इटलीनेआयर्लंडचा चार विकेट्सने पराभव केला. इटलीने शेवटच्या दोन षटकांमध्ये तीन चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. महत्त्वाची बाब म्हणजे, या सामन्यात एका फलंदाजाने थेट भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीशी बरोबरी केली.
शेवटच्या २ षटकांत फिरला खेळ
इटलीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडला पूर्ण २० षटके खेळता आली नाहीत आणि १९.४ षटकांत १५४ धावांतच त्यांचा डाव संपला. १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, इटलीला विजयासाठी शेवटच्या दोन षटकांत ३० धावांची आवश्यकता होती. ११व्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या फलंदाजाने सामना फिरवला. ग्रँट स्टीवर्टच्या अद्भुत कामगिरीने इटलीने हा इतिहास रचला. १२ चेंडूंत ३० धावा करण्याचे आव्हान त्याने पेलले. इटलीचा ग्रँट स्टीवर्ट याने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. ग्रँट स्टीवर्टने सलग तीन षटकार मारून इटलीला विजय मिळवून दिला. ग्रँट स्टीवर्टने १९ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या, ज्यात चार षटकारांचा समावेश होता.
रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली
आयर्लंडच्या पराभवाने क्रिकेट चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटले, परंतु या सामन्यादरम्यान त्यांचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने रोहित शर्माच्या सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. स्टर्लिंगने त्याच्या कारकिर्दीत १५९ टी२० सामने खेळले. इटलीविरुद्धचा पराभव आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगचा १५९ वा टी२० सामना होता.