नवी दिल्ली : कामचलाऊ गोलंदाजीचे अनेक पर्याय संघाचे संतुलन साधण्यात व विविधता निर्माण करण्यात उपयुक्त ठरतात आणि सध्या भारतीय संघाला त्याची उणीव भासत आहे, असे मत आपल्या गोलंदाजीमुळे अनेक भागीदारी संपुष्टात आणणाऱ्या सुरेश रैनाने व्यक्त केले. पाठीवरील शस्त्रक्रियेनंतर अष्टपैलू हार्दिक पांड्याने (केवळ एका लढतीचा अपवाद वगळता) गोलंदाजी केलेली नाही. अशा स्थितीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी संपलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत पर्यायांची उणीव भासली.
रैना म्हणाला,‘फलंदाजाचे गोलंदाजी करणे व गोलंदाजाचे फलंदाजी करणे अधिक महत्त्वाचे आहे. संघासाठी नेहमी ते उपयुक्त ठरते. एखादा फलंदाज जर चार-पाच षटके गोलंदाजी करीत धावगतीवर लगाम घालत असेल तर कर्णधारासाठी पर्याय उपलब्ध होतो. त्यानंतर तुमचे नियमित गोलंदाज गोलंदाजी करू शकतात. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारखे दिग्गज फलंदाज नियमित गोलंदाजी करीत होते. त्यामुळे संघाचा समतोल साधण्यास मदत मिळत होती.’
सचिन नियमित गोलंदाजी करीत होता. सेहवागनेही अनेक बळी घेतले. युवराजने आपल्याला विश्वकप जिंकून देण्यात महत्त्वाचा भूमिका बजावली. ज्यावेळी आम्ही गावात स्पर्धा खेळत होतो त्यावेळी आम्हाला फलंदाजीसह गोलंदाजीही करावी लागत होती. अन्यथा संघात आमची निवड होत नव्हती.क्षेत्ररक्षणही चांगले असायला हवे. कारण फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये संधी मिळेलच हे निश्चित नसते, असेही रैना म्हणाला.