नवी दिल्ली: नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) तब्बल 12,600 कोटींचा घोटाळा केल्यानंतर बँकेची प्रतिमा चांगलीच मलीन झाली आहे. या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांच्या ठेवींना कोणताही धोका नाही, असे बँकेकडून आश्वस्त करण्यात आले होते. परंतु, या सगळ्यामुळे बँकेची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने पंजाब नॅशनल बँकेसोबतच्या कराराचे नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट हा बँकेचा सदिच्छादूत आहे. मात्र, नुकत्याच उघड झालेल्या घोटाळ्यामुळे विराटने ही भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
विराटच्या क्रिकेट एजन्सीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली. विराटने यापुढे बँकेसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्याच्या कराराची मुदत संपेपर्यंत विराट त्यांच्यासोबत असेल. मात्र, सध्याच्या कराराचे नुतनीकरण केले जाणार नाही. या संपूर्ण घटनाक्रमात बँक म्हणून पीएनबीचा कोणताही दोष नाही, असे आम्हाला वाटते. विराट ठरलेल्या कराराची मुदत पूर्ण करणार आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून करार रद्द केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँण्ड एंटरन्टेन्मेंटचे सीईओ बंटी सजदेह यांनी सांगितले.
यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेने विराटने सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) म्हणून असलेला त्यांच्यासोबतचा करार रद्द केल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. थकीत कर्जांमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रात चितेंचे वातावरण असताना स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी 'पीएनबी'ने विराटला करारबद्ध केले होते.