गुवाहाटी - सुरुवातीचे दोन्ही सामने सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आज रविवारी येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. संजू सॅमसनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल, कारण रायपूरमध्ये शानदार पुनरागमन करीत ईशान किशनने त्याच्यावर एकप्रकारे दडपण वाढविले आहे.
किशनच्या वादळी खेळीमुळे अभिषेक शर्माचा आवडीचा सलामी जोडीदार कोण, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली. संजू सॅमसन मात्र सातत्य राखण्यास झुंजताना दिसत आहे. टी-२० विश्वचषक सुरू होण्यास आता केवळ दोन आठवडे उरले असून, त्याआधी भारताला न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित तीन सामने खेळायचे आहेत. त्याआधी भारतीय संघ संयोजन निश्चित करावेच लागेल.
भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली होत असली तरी काही जागांबाबत चिंता आहे, त्यापैकी एक स्थान संजू सॅमसनचे आहे. किशनने ३२ चेंडूंमध्ये केलेल्या शानदार ७६ धावांच्या खेळीमुळे संजूवरील दडपण आणखी वाढले. दिलासादायक बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा धडाकेबाज फॉर्ममध्ये परतला. त्याने ३७ चेंडूंमध्ये ८२ धावा करीत मागील २३ टी-२० डावांनंतर पहिले अर्धशतक झळकावले. अभिषेकसोबत सलामीवीर म्हणून संघात आलेल्या सॅमसनला मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेता आलेला नाही. त्याला भरपूर सामने खेळण्याची संधी मिळाली तरी संजू चाचपडताना दिसतो.
आवडत्या फलंदाजी क्रमांकावर परतल्यानंतरही केरळचा हा यष्टीरक्षक-फलंदाज अपेक्षापूर्ती करू शकलेला नाही. ही मालिका त्याच्यासाठी निर्णायक ठरू शकते. वेगवान गोलंदाजांविरुद्ध संजूची कमजोरी पुन्हा एकदा उघड झाली. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जोफ्रा आर्चरकडून सलग तीन वेळा बाद होण्यासह पाच वेळा वेगवान गोलंदाजांकडून स्वस्त बाद झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांत संजूने केवळ १० आणि ६ धावा केल्या. काईल जेमिसन आणि मॅट हेन्री यांनी त्याला माघारी धाडले.
न्यूझीलंड मुसंडी मारणार?
भारत आघाडीवर असला तरी न्यूझीलंड संघ मुसंडी मारण्यात कुशल आहे. त्यांनी एकदिवसीय मालिका अशीच जिंकली. सामन्यांमधील अंतर कमी असल्यामुळे संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजांना रोटेशननुसार खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडबाबत सांगायचे तर, या मोठ्या पराभवानंतर ते कशी पुनरागमन करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील संघ काही धोरणात्मक बदलांचा विचार करू शकतो. फॉर्ममध्ये असलेल्या डॅरिल मिचेलला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. शुक्रवारी सँटनर आणि ईश सोढी यांच्यासह अनेक खेळाडूंनी सोपे झेल सोडले. या विभागात न्यूझीलंडला तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे.
संजूचे तंत्र अचूक नाही
माजी सलामीवीर डब्ल्यू. व्ही. रमन यांनी रायपूरमध्ये संजू बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अचूक वर्णन केले. रमन यांनी ‘एक्स’वर लिहिले, ‘जोपर्यंत सॅमसन चेंडूच्या वेगानुसार आपल्या बॅटचा वेग तांत्रिकदृष्ट्या योग्य करीत नाही, तोपर्यंत त्याची कामगिरी चांगली होणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचे तर, कोणतीही गाडी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी एकाच वेगाने चालवता येत नाही.’