India vs South Africa : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिकेतील आव्हान जीवंत राखले. भारताने तिसरा सामना 48 धावांनी जिंकला. या सामन्यात इशान किशन व ऋतुराज गायकवाड यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्यानंतर हर्षल पटेल व युजवेंद्र चहल यांनी गोलंदाजीत कमाल केली आणि 180 धावांच्या लक्ष्याचा पाटलाग करणाऱ्या आफ्रिकेचा डाव 131 धावांवर गुंडाळला. या सामन्यात इशान किशन व आफ्रिकेचा गोलंदाज तब्रेज शम्सी यांच्यात वाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
फिरकीपटू शम्सी आणि इशान यांच्यात भारताच्या डावातील 9व्या षटकात शाब्दिक वाद झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इशानने खणखणीत षटकार मारल्यानंतर पुढील चेंडूवर रिव्हर्स स्विपद्वारे फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
ऋतुराज आणि इशान यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकवाताना पहिल्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. १०व्या षटकात ऋतुराज ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरनेही चांगले फटके मारले, परंतु तो १४ धावांवर माघारी परतला. श्रेयसने इशानसह १८ चेंडूंत ३१ धावा जोडल्या. इशानने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा केल्या. १५व्या षटकात हार्दिक पांड्या १ धावेवर असताना डेव्हिड मिलरने सोपा झेल टाकला. पांड्याने ३१ धावा करताना भारताची धावसंख्या ५ बाद १७९ धावा अशी पोहोचवली.
प्रत्युत्तरात आफ्रिकेचा निम्मा संघ ७१ धावांवर माघारी परतला. त्यांचे पुनरागमन करणे अवघडच झाले होते. हेनरीक क्लासेनचा ( २९) अडथळा दूर केला. चहलने ४ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने 4 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ १३१ धावांत माघारी पाठवला. भारताने ४८ धावांनी सामना जिंकला.