मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : इशांत शर्माने ऑस्ट्रेलियाचा शेवटचा फलंदाज बाद करून भारताला बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून दिला. भारताच्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 261 धावांवर आटोपला. इशांतने दोन्ही डावांत मिळून केवळ 3 विकेट घेतल्या, परंतु भारताच्या या विजयासह त्याने एक मोठा पराक्रम केला आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही व्ही एस लक्ष्मण या दिग्गजांनाही न जमलेल्या विक्रमाची नोंद इशांतच्या नावावर रविवारी झाली.
8 बाद 258 धावांवरून पाचव्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तीन धावांची भर घालता आली. पॅट कमिन्सने 114 चेंडूंत 5 चौकार व एक षटकार खेचून 63 धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. त्यात पाचव्या दिवशी पावसाचीही त्याला मदत मिळाली. पाचव्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले. पण, उपाहारानंतर पाऊस थांबला आणि भारताने अवघ्या 4.3 षटकांत यजमानांचा डाव गुंडाळला. इशांने कांगारूंची अखेरची विकेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. इशांतचा हा 267 वा कसोटी बळी ठरला. भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सहाव्या स्थानावर आला आहे.
इशांत हा परदेशात ( झिम्बाब्वे वगळता ) सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर 11 विजय नोंदवले गेले आहेत. या विक्रमात द्रविड आणि लक्ष्मण प्रत्येकी दहा विजयासह दुसऱ्या स्थानावर आहेत. गावस्कर यांच्या नावावर 9, तर बिशनसिंग बेदी, महेंद्रसिंग धोनी,
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावावर प्रत्येकी 8 विजय आहेत.