भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याचे ट्विट पुन्हा चर्चेला आले. काही दिवसांपूर्वी इरफानने केलेल्या ट्विटने वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर माजी फिरकीपटू अमित मिश्राने उत्तर दिले होते. पण, आता इरफानने त्यावर आणखी एक ट्विट केले आहे.
पठाणने २९ कसोटी, १२० वन डे व २४ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज आहे आणि २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला होता. ''माझा देश, माझा सुंदर देश, याच्याकडे जगातील सर्वोत्तम देश होण्याची क्षमता आहे, परंतु...'', असे ट्विट इरफानने केले.
हे ट्विट नक्की कोणत्या घटनेशी संबंधित आहे, हे इरफानने सांगितले नाही. पण, सध्या देशात सुरू असलेल्या जातीय दंगलींशी याचा संबंध जोडला जात आहे.
काही तासांतच इरफानच्या या ट्विटला दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अमित मिश्रा याने उत्तर दिले. अमितने हे ट्विट करताना इरफानला टॅग केले नाही किंवा त्याचा उल्लेखही केला नाही. पण, अमितचे हे ट्विट इरफानसाठीच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमितने लिहिले की,''माझा देश, माझ्या सुंदर देशामध्ये पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता आहे….. जर काही लोकांना हे समजले की आपली राज्यघटनेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.''
त्यानंतर आज इरफानने आणखी एक ट्विट केले. त्याने संविधानाची एक प्रत पोस्ट केली आणि लिहिले की, नेहमी याचे अनुसरण करा आणि आपल्या सुंदर देशाच्या प्रत्येक नागरिकाला याचे पालन करण्यास मी उद्युक्त करतो. कृपया वाचा आणि पुन्हा वाचा...