डेव्हेंटर ( नेदरलँड्स) : आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाने सोमवारी अनेक विक्रमांना गवसणी घातली. यजमान नेदरलँड्सविरुद्धचा हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला असला तरी आयर्लंडच्या खेळाडूंनी विक्रमांच्या पंत्कीत एन्ट्री घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गॅबी लुईस आणि ओर्ला प्रेंडरगास्ट या आयर्लंडच्या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 58 चेंडूंत 112 धावांची भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीय आयर्लंड महिला संघाकडून सलामीच्या फलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. शिवाय त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
लुईसने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील दुसरे अर्धशतक झळकावले. तिने 41 चेंडूंत 4 षटकार व 6 चौकारांसह 71 धावांची खेळी केली. ही तिची ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी तिनं 2018मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध 61 धावा केल्या होत्या. दुसरीकडे तिसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या 17 वर्षीय प्रेंडरगास्टने 26 चेंडूंत 5 चौकार खेचून 38 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 112 धावांची सलामी दिली. आयर्लंडकडून ही सर्वोत्तम सलामीची भागीदारी ठरली. या कामगिरीसह लुईस व प्रेंडरगास्ट यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली व मेग लॅनिंग यांनी 2012 मध्ये भारताविरुद्ध नोंदवलेल्या 112 धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली. महिला क्रिकेटमध्ये ही 22 वी सर्वोत्तम भागीदारी ठरली.
दोन्ही सलामी माघारी परतल्यानंतर लीह पॉलने 6 चेंडूंत 14 धावा केल्या. रेबेका स्टोकेलने 24 चेंडूंत 36 धावा कुटल्या, तर मेरी वॉल्ड्रोनने 22 चेंडूंत नाबाद 31 धावा करताना संघाला 200 धावांचा पल्ला पार करून दिला. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयर्लंड संघाने दोनशे धावांचा पल्ला ओलांडला. आयर्लंडने 4 बाद 213 धावा केल्या. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही सातवी सर्वोत्तम धावसंख्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना 2.4 षटकानंतर पाऊस सुरू झाला आणि सामना रद्द करावा लागला.
c