Join us

आयपीएलमधील स्टार क्रिकेटपटूला अटक, बलात्काराचा आरोप, विमानातून उतरताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sandeep Lamichhane: नेपाळच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये खेळलेला स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछाने हा गंभीर आरोपांमुळे अडचणीत सापडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 12:13 IST

Open in App

काठमांडू - नेपाळच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये खेळलेला स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछाने हा गंभीर आरोपांमुळे अडचणीत सापडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बलात्काराचा आरोप असलेला संदीप लामिछाने हा मायदेशी परतल्यावर विमानातून उतरताच काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. 

नेपाळचा स्टार क्रिकेटपटू असलेल्या संदीप लामिछानेवर एका १७ वर्षीय मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. लामिछाने याने काठमांडूमधील एका हॉटेलमध्ये आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप या मुलीने केला होता. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्या तक्रारीमधील उल्लेखानुसार २२ वर्षीय लामिछाने याने ऑगस्ट महिन्यात एका हॉटेलमध्ये माझ्यावर बलात्कार केला. तसेच २१ ऑगस्ट रोजी तो मला काठमांडू आणि भक्तपूरमधील विविध ठिकाणी घेऊन गेला, असे या मुलीने म्हटले आहे.

संदीप लामिछाने हा आयपीएल खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रॅचायझीकडून पदार्पण करत क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.दरम्यान, मायदेशी परतण्यापूर्वी संदीप लामछाने याने एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने मी तपासाला पूर्ण सहकार्य करेल. या प्रकरणाची जलद सुनावणी होईल आणि मला न्याय मिळेल आणि मी लवकरच देशासाठी क्रिकेटच्या मैदानात उतरेन, असा विश्वास व्यक्त केला होता.  

टॅग्स :गुन्हेगारीआयपीएल २०२२नेपाळ
Open in App