नवी दिल्ली : भारतात कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशात आयपीएलचे आयोजन विदेशात करण्याचा पर्याय खुला ठेवण्याची काही गरज नाही, असे मत भारतीय क्रिकेट बोर्डचे कोषाध्यक्ष अरुणसिंग धुमल यांनी व्यक्त केले. 
आयपीएल संचालन परिषदचेे सदस्य धुमल म्हणाले, बोर्डला विश्वास आहे की, २०२१ च्या आयपीएलचे आयोजन भारतात होईल. आयपीएलचे यापूर्वीचे सत्र यूएईमध्ये खेळविण्यात आले होते. ते म्हणाले, ‘आम्ही भारतात आयपीएलच्या आयोजनासाठी काम करीत आहोत. आम्ही सध्या बॅकअपबाबत विचार करीत नाही. आम्ही सर्व या स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यास उत्सुक आहोत. सध्या भारत यूएईच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. आशा आहे की परिस्थिती गंभीर होणार नाही आणि त्यात सुधारणा होईल.’  
 यूएईमध्ये कोरोना संक्रमणाचा आकडा वाढत आहे तर भारतात आकडेवारी घसरत आहे. यूएईमध्ये १९ सप्टेंबरला आयपीएलला सुरुवात झाली त्या एका आठवड्यात कोरोना संक्रमणाची सरासरी ७७० होती. त्यात आता वाढ होऊन ३,७४३ झाली आहे.