Join us  

"हे खरं असेल तर ते फारच चुकीचे आहे", BCCI च्या निर्णयावरून IPL संघमालकांमध्ये नाराजी! 

IPL ची वाढती लोकप्रियता पाहता जगातील अनेक देशांमध्ये स्थानिक पातळीवरील टी-२० लीगच्या आयोजनास सुरूवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:47 AM

Open in App

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). आयपीएलची वाढती लोकप्रियता जगातील पाहता अनेक देशांमध्ये स्थानिक पातळीवरील टी-२० लीगच्या आयोजनास सुरूवात झाली. मात्र आयपीएल एवढे यश कोणत्याच इतर देशातील लीगला आले नाही. इतर देशातील लीगमध्ये खेळणारे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात मात्र आयपीएलमध्ये खेळणारे भारतीय खेळाडू विदेशातील लीगमध्ये खेळू शकत नाहीत. सध्या यावरून क्रिकेट वर्तुळात एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे. 

कोणत्याच भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) परवानगी दिली नाही. दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी-२० लीगने क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. मात्र भारतीय खेळाडू या लीगमध्ये खेळू शकणार नाहीत. लक्षणीय बाब म्हणजे एखाद्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीदेखील त्याला विदेशातील लीगमध्ये खेळता येणार नाही. आयपीएलमध्ये (IPL) खेळलेला कोणताच भारतीय खेळाडू या लीगमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेतही असू शकत नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले. 

BCCI ने स्पष्ट केली भूमिकाजर एखाद्या भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये खेळायचे असेल तर त्याला बीसीसीआयशी असलेले सर्व संबंध तोडावे लागतील. महेंद्रसिंग धोनी अन्य लीगमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो का अशी विचारणा केली असता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, "त्याला विदेशातील लीगमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तो आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. त्याला सर्वप्रथम भारताच्या लीगमधून निवृत्त व्हावे लागेल." एकूणच आयपीएलमधून वेगळे झाल्यानंतरच कोणत्याही भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये सहभागी होता येणार आहे. 

...तर BCCI चा निर्णय पूर्णपणे चुकीचादक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने संघ खरेदी केला आहे. यासाठी आपल्या संघाचा प्रशिक्षक म्हणून फ्रँचायझीला दिग्गज कर्णधार धोनीला ठेवायचे होते. मात्र बीसीसीआयने स्पष्टपणे याला नकार दिला होता. तसेच इतर लीगमध्ये खेळण्यासाठी त्याला बीसीसीआयशी असलेले सर्व संबंध तोडावे लागतील असे म्हटले होते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) या निर्णयामुळे आयपीएल फ्रँचायझीच्या संघमालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

इनसाइडस्पोर्टच्या एका अहवालात एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने म्हटले, "अद्यापही आम्ही बीसीसीआयच्या अधिकृत उत्तराची वाट पाहत आहोत. आम्हाला जी माहिती मिळाली आहे, ती सर्व माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. मात्र हे खरे असेल तर बीसीसीआयचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे." तसेच आम्ही आमच्या सपोर्ट स्टाफ आणि इकोसिस्टम यांचा विदेशातील लीगमध्ये वापर करू शकतो. जर बीसीसीआयने याला रोखले तर ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे अधिकाऱ्याने अधिक म्हटले. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२
Open in App