अबुधाबी : ज्या दिवसाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने प्रतीक्षा करीत होते, अखेर तो दिवस उजाडला. इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) शनिवारपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर १५ आॅगस्टला अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीचा खेळ पुन्हा पाहण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक आहेत.
मुंबई Vs चेन्नई
28एकूण सामने
17 विजयी मुंबई इंडियन्स
11 विजयी चेन्नई
- 2019 च्या सत्रात मुंबईने चारही सामन्यांत विजय मिळविला. त्यात दोन साखळी सामने, एक क्वालिफायर व अंतिम सामन्याचा समावेश होता.
- गतविजेते मुंबई आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्ज या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना अबुधाबी येथे रंगणार आहे.
- भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता ही लढत सुरू होईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असून, पहिल्यांदाच या अत्यंत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे.
- सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पुढील ५३ दिवस रंगणारे आयपीएलचे सामने पाहणे हा क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा विरंगुळा असणार आहे. सोशल मीडियावरही आयपीएलचीच जोरदार चर्चा रंगू लागली आहे.