IPL मेगा लिलावात उशीरा बोली लावण्यास सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघात खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्याची चांगलीच चुरस पाहायला मिळाली. अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीतील ऑल राउंडच्या गटातील एका खेळाडूसाठी लाखांचा डाव कोटयवधीत गेल्याचे पाहायला मिळाले. यात शेवटी मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघानं बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.
कोण आहे तो खेळाडू ज्याला MI च्या संघानं केलं 'करोडपती'
मुंबई इंडियन्सच्या संघानं ज्या खेळाडूवर कोट्यवधींची बोली लावली त्या खेळाडूचं नाव नमन धीर असं आहे. डाव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा हा खेळाडूनं गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलच्या मैदानात एन्ट्री मारलेल्या नमन धीरनं ७ सामन्यातील ७ डावात एका अर्धशतकाच्या मदतीने १४० धावा केल्या होत्या. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात नमन धीर याने २८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली होती. IPL मधील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याची हीच खेळी मुंबई इंडियन्सच्या मनात भरली अन् तो मेगा लिलावात करोडपती झालाय.
३० लाख या मूळ किंमतीसह लिलावात नोंदवले होते नाव
मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला रिलीज केले होते. ३० लाख या मूळ किंमतीसह तो लिलावात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघाला त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी एवढी रक्कम द्यावे लागेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण राजस्थान रॉयल्सच्या संघाने या खेळाडूला आपल्यात सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील चढाओढीमध्ये त्याच्यावर लागलेल्या बोलीचा आकडा ३.४० कोटींच्या घरात पोहचला. त्यानंतर MI ला RTM चा पर्याय देण्यासाठी RR ला शेवटची बोली लावण्याची संधी देण्यात आली. यावेळी राजस्थान रॉयल्सच्या संघाने थेट ५.२५ कोटी बोली लावली. ही रक्कम देण्याची तयारी दाखवत MI नं RTM च्या माध्यमातून राजस्थान रॉयल्सचा डाव हाणून पाडला.