Shreyas Iyer Punjab Kings, IPL Auction 2025 Players Live : टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडणारा आणि गेल्या वर्षी कोलकाता नाइट रायडर्स संघाला विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करून दाखवणाऱ्या श्रेयस अय्यरला मेगा लिलावात मोठी लॉटरी लागली. पंजाब किंग्ज संघाने तब्बल २६ कोटी ७५ लाखांची बोली लावत श्रेयस अय्यरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. IPL इतिहासातील श्रेयस अय्यर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये श्रेयस अय्यरसाठी जोरदार टक्कर पाहायला मिळाली.
अवघ्या २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीवरून बोली सुरु झाली होती. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांकडे यंदाच्या वर्षी सर्वाधिक पैसे शिल्लक असल्याने त्यांनी बोली लावण्यात उडी घेतली. पाहता पाहता बोली १० कोटी-२० कोटींच्याही पुढे निघून गेली. अखेर बोलीने जुना इतिहास मोडीत काढत नवा इतिहास रचला आणि श्रेयस अय्यर २६ कोटी ७५ लाख रुपयांच्या बोलीसह सर्वात महागडा खेळाडू ठरला.
गेल्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चॅम्पियन ठरला होता. संघाला चॅम्पियन करूनही शाहरुखच्या संघाने श्रेयस अय्यरला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यर २ कोटी मूळ किंमतीसह लिलावात सहभागी झाला होता. त्यानंतर श्रेयसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळी केल्याचा त्याला आजच्या लिलावात फायदा झाला.
प्रीती झिंटाच्या पंजाब किंग संघाने लिलावाआधी अतिशय धक्कादायक निर्णय घेत अनेक बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करण्याची मुभा असूनही पंजाबच्या संघाने लिलावाआधी केवळ दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले. त्यापैकी शशांक सिंग याला ५ कोटी ५० लाखांच्या रकमेसह रिटेन करण्यात आले. तर सलामीवीर प्रभसीमरन सिंग याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींना रिटेन केले गेले.