आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी मजबूत संघ बांधणी करण्यासाठी १० फ्रँचायझी संघ सौदी अरेबियातील जेद्दाह शहरातील मेगा लिलावात सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मेगा लिलावात परदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडूंना चांगला भाव मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवणाऱ्या भारतीय गोलंदाजाचाही मोठा भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने अंशुल कंबोजवर ३ कोटीहून अधिक बोली लावली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये हवा, एका डावात १० विकेट्स घेण्याचाही केलाय पराक्रम
हरयाणाच्या या खेळाडूनं गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. अंशुल कंबोजने दुलीप ट्रॉफीमध्ये ८ विकेट्स घेत यंदाच्या देशांतर्गत हंगामात दमदार सुरुवात केली होती. रणजी करंडक स्पर्धेत त्याने विक्रमी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. केरळविरुद्धच्या रणजी सामन्यात या पठ्ठ्यानं एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या.
MI च्या ताफ्यातून पदार्पण करणारा हा खेळाडू आता CSK कडून खेळणार
मुंबई इंडियन्सच्या संघानं रिलीज केल्यावर ३० लाख या मूळ किंमतीसह हा खेळाडू लिलावात उतरला होता. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने मोठी बोली लावात या खेळाडूला करोडपती केल्याचे पाायला मिळाले. CSK च्या संघानं त्याच्यासाठी ३.४ कोटी एवढी मोठी रक्कम मोजली. मेगा लिलावातील ही एक मेगा सरप्राइजच आहे. गत हंगामात जो खेळाडू MI कडून खेळताना दिसला तो आता CSK च्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे.
अनेक स्टार क्रिकेटर अनसोल्ड, मोठी बोली लागलेल्या अनकॅप्ड खेळाडूंमध्ये अंशुलचा लागला नंबर
आयपीएल मेगा लिलावाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी अनेक स्टार खेळाडू मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्याचे पाहायला मिळाले. यात हरयाणाच्या खेळाडूसाठी लागलेली बोली आश्चयकारक अशी आहे. चेन्नईच्या ताफ्यातून त्याला किती संधी मिळणार? तो इथंही हवा करणार का? ते पाहण्याजोगे असेल.