Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List : मेगालिलावासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलाव प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तब्बल ५ तासांनी आपला पहिला नवा खेळाडू विकत घेतला. लिलावाआधी मुंबईने ५ तगडे खेळाडू संघात रिटेन करून ठेवले होते. त्यामुळे मुंबईचा संघ यंदा कुठल्या खेळाडूंना संघात घेतो याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजल्यापासून बोली लावायला सुरुवात झाली. तब्बल ५ तास मुंबईने एकही खेळाडू खरेदी केला नव्हता. अखेर रात्री ८.३० नंतर मुंबईने एका वेगवान गोलंदाजासाठी बोली लावायला सुरुवात केली. २ कोटींच्या मूळ किमतीवरून बोलीला सुरुवात झाली. मुंबई आणि राजस्थान यांच्यात चांगली झुंज पाहायला मिळाली. अखेर १२ कोटी ५० लाखांच्या बोलीसह मुंबईने आपला पहिला नवा खेळाडू मिळवला. तो नवा खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान डावखुरा गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult). जसप्रीत बुमराहसोबत ट्रेंट बोल्ट संघात आल्याने मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना सुखद धक्का बसला.
-----
मुंबई इंडियन्सचा संघ पाच खेळाडूंना कायम ठेवून लिलावात उतरला होता. त्यांनी जसप्रीत बुमराहला सर्वाधिक १८ कोटींना संघात रिटेन केले. सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या या दोघांना प्रत्येकी १६ कोटी ३५ लाख रुपयांच्या रकमेसह संघात कायम ठेवले. रोहित शर्माला १६ कोटी ३० लाख रुपयांसह रिटेन केले. तर तिलक वर्माला ८ कोटींसह संघात कायम ठेवले. त्यात आता वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचीही भर पडल्या मुंबईचा संघ तगडा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
दरम्यान, आगामी IPL हंगामासाठी यंदाच्या लिलावात एकूण ५७७ खेळाडूंचे भवितव्य ठरत आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रत्येक संघाला आपल्या संघातील कायम ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू सांगायचे होते. त्यानुसार, १० संघांनी मिळून एकूण ४६ खेळाडूंन संघात कायम ठेवले. आता १० संघांसाठी ५७७ पैकी एकूण २०४ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात. तसेच, काही खेळाडू अनपेक्षितपणे ‘अनसोल्ड’ म्हणजेच न विकलेलेच राहण्याचीही शक्यता आहे. २४ आणि २५ असे दोन दिवस हा मेगालिलाव सुरु आहे.