आयपीएल २०२६ चा बिगुल आजपासून वाजत असून, सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मैदानात परतणारा विराट या सामन्यात केवळ धावाच करणार नाही, तर टी-२० फॉरमॅटमध्ये आशियाचा नंबर वन फलंदाज बनण्याचा मानही मिळवू शकतो.
सध्या टी-२० क्रिकेटमध्ये आशियाई फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर आहे. मात्र, विराट कोहली हा विक्रम मोडण्यापासून केवळ २९ धावा दूर आहे. शोएब मलिकने टी-२० क्रिकेटमध्ये ५५७ सामन्यात १३ हजार ५७१ धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीने ४१४ सामन्यात १३ हजार ५४३ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात विराटने २९ धावा केल्यास तो आशियातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
हे देखील वाचा: आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर; तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी आणि कुठं रंगणार?
विराट कोहली इतिहास घडवणार
विराट कोहलीची आकडेवारी त्याच्या महानतेची साक्ष देते. ४१.९२ च्या सरासरीने आणि १३४.६७ च्या स्ट्राइक रेटने त्याने धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याच्या नावावर टी-२० मध्ये तब्बल ९ शतके आणि १०५ अर्धशतके आहेत. घरच्या मैदानावर विराटचा रेकॉर्ड पाहता, आज हा विक्रम मोडला जाण्याची दाट शक्यता आहे.
Rinku Singh:आयपीएल २०२६ आधी केकेआरनं खेळला मोठा डाव; रिंकू सिंगवर सोपवली मोठी जबाबदारी!
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. युनिव्हर्स बॉसने ४६३ सामन्यांत १४ हजार ५६२ धावांचा डोंगर उभा केला आहे. विराट सध्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. गेलला मागे टाकण्यासाठी विराटला अजून १ हजार २० धावांची गरज आहे.