रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरसीबीचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिडने थेट पंचांच्या कामात हस्तक्षेप केल्याने नवा वाद निर्माण झाला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
आरसीबीची फलंदाजी सुरू असताना ही घटना घडली. सामन्यादरम्यान चेंडूच्या स्थितीबाबत काही शंका निर्माण झाल्या. नियमानुसार, चेंडूची तपासणी करणे आणि तो बदलायचा की नाही? याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ पंचांचा असतो. पंच जेव्हा चेंडूची पाहणी करत होते, तेव्हा टिम डेव्हिड तिथे आला आणि त्याने पंचांच्या हातातील चेंडू हिसकावून घेतला आणि त्याची तपासणी केली.
पंचांशी भिडल्याचा व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटच्या नियमांनुसार, चेंडू बदलण्याचा अधिकार पंचांचा आहे, खेळाडूंचा नाही. मात्र स्वतः चेंडू घेऊन तपासणी करू शकत नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, टिम डेव्हिडने चेंडू हातात घेऊन तो वर-खाली उडवण्यास सुरुवात केली. पंचांनी त्याला वारंवार हटकले आणि चेंडू परत करण्याची सूचना दिली. पंचांनी त्याला नियमांची आठवण करून दिली. तरीही डेव्हिड त्यांच्याशी हुज्जत घालताना आणि आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले. मैदानातील या गोंधळाचा आवाज स्पष्ट ऐकू येत नसला तरी, डेव्हिडचा आडमुठेपणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार पंचांच्या कामात अडथळा आणणे, हा गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र, या घटनेनंतर अद्याप टिम डेव्हिडवर कोणतीही अधिकृत कारवाई किंवा दंड आकारण्यात आलेला नाही.
चाहते भडकले
सोशल मीडियावर चाहत्यांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, खेळाडूंनी मैदानातील शिस्त पाळायला हवी, अशी मागणी केली जात आहे. आता बीसीसीआय किंवा आयपीएल प्रशासन यावर काय पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.