जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, लीगच्या सुरुवातीलच एक धक्कादायक घटना घडली आहे. बीसीसीआयचे ब्रॉडकास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. मुंबईमधील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार विल्यम लँगफोर्ड हे २४ मार्चपासून ट्रायडन्ट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना आटोपल्यानंतर लँगफोर्ड हे त्यांच्या हॉटेलमधील खोलीवर परतले होते. मात्र ३० मार्च रोजी हॉटेलच्या रिसेप्शनवरून त्यांच्या खोलीमध्ये करण्यात आलेल्या फोनला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर माहिती घेण्यासाठी कर्मचारी खोलीजवळ गेले. तेव्हाही त्यांना खोलीमधून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मास्टर कीच्या मदतीने दरवाजा उघडला असता विल्यम लँगफोर्ड हे निपचित पडलेले दिसून आले. त्यानंतर हॉटेलमधील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
विल्यम लँगफोर्ड हे ब्रिटिश नागरिक होते. तसेच आयपीएलच्या प्रसारणासाठी ते भारतात आले होते. दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास आता पोलीस करत आहेत.