देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या सरफराज खानला अखेर महेंद्रसिंग धोनीच्या सीएसकेने ७५ लाखांच्या मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. या निर्णयानंतर सरफराज खान अत्यंत भावूक झाला असून त्याने सीएसकेचे आभार मानले. सीएसके आपल्याला नवीन आयुष्य दिल्याचे त्याने म्हटले आहे.
लिलावाच्या काही तास आधीच सरफराजने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटने धमाका केला. त्याने अवघ्या २२ चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. याच तुफानी फॉर्मची दखल घेत सीएसकेने त्याच्यावर विश्वास दाखवला. २०२३ नंतर आयपीएलमधून बाहेर असलेल्या सरफराजसाठी ही एक नवीन सुरुवात मानली जात आहे.
सरफराजची इमोशनल पोस्ट
सीएसकेच्या संघात निवड झाल्यानंतर सरफराजने इंस्टाग्रामवर एक भावूक स्टोरी शेअर केली. "मला नवीन आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद", असे त्याने लिहिले. महत्त्वाचे म्हणजे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने मोठी कामगिरी करूनही त्याला आयपीएलमध्ये फारशी संधी दिली जात नव्हती. मात्र, आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या सीएसकेचा पाठिंबा मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्म
सरफराज खान सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या वर्षीच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ६ डावात ६४ च्या सरासरीने २५६ धावा कुटल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १८२ पेक्षा जास्त आहे. लिलावाच्या दिवशी केलेली २२ चेंडूतील ७३ धावांची खेळी पाहूनच सीएसकेने त्याला आपल्या ताफ्यात घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सीएसकेचे आश्चर्यचकीत करणारे निर्णय
आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सीएसकेने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. युवा फलंदाज कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर या दोन खेळाडूंना विक्रमी बोलीवर खरेदी करून सीएसकेने इतिहास रचला. शिवाय, सीएसकेने संजू सॅमसनला १८ कोटी खर्चून संघात सामील केले. तर, अकील होसेन, मॅट हेन्री आणि राहुल चहर यांनाही आपल्या ताफ्यात घेतले. याउलट सीएसकेने रवींद्र जडेजा, सॅम करन आणि मथिशा पाथिराना यांना रिलीज करण्याचे मोठे धाडस दाखवले.