IPL २०२६ स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २८ मार्चपासून १९ व्या हंगामातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नव्या हंगामात हिट शो दाखवून संघाला सहाव्यांदा IPL ट्रॉफी जिंकून देण्यासाठी रोहित शर्मानं कंबर कसली आहे. भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने सरावाला सुरुवात केली असून MI च्या कॅम्पमधील उत्तुंग फटकेबाजीचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. गगनचुंबी षटकार मारल्यावर तो स्वत: कॅच इट असे म्हणताना दिसले.
हिटमॅन रोहितची तुफान फटकेबाजी, व्हिडिओ व्हायरल
रोहित संघाचा कर्णधार नसला तरी टीमच्या थिंक टँकचा तो महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या फिटनेसबाबत अलीकडे प्रश्न उपस्थित होत होते, पण सरावावेळी तो चांगल्या लयीत दिसला. या आयपीएलमध्ये त्याला पुन्हा मोठ्या धावा करण्याची गरज आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितने शार्दुल ठाकूर च्या चेंडूवर तुफानी षटकार ठोकला आणि लगेचच कॅच घेण्याची आवाज दिला. पण चेंडू थेट पॅव्हेलियनमध्ये जाऊन पडल्याने कॅच होण्याचा प्रश्नच नव्हता. हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
२९ मार्चला MI चा संघ उतरणार मैदानात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीसह यंदाच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात हा सामना रंगणार आहे.
मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ, पण...
जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. या सर्व ट्रॉफी MI नं रोहित शर्माच्या कॅप्टन्सीत जिंकल्या आहेत. नेतृत्व बदलानंतर मुंबई इंडियन्सची कामगिरी घसरल्याचे पाहायला मिळाले. २०२४ च्या हंगामात तळाला राहिल्यावर MI च्या संघाने गत हंगामात आघाडीच्या ४ मध्ये धडक मारली होती. आता यात आणखी सुधारणा करून पुन्हा ते आपले जुने तेवर दाखवून देणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा असतील. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर रुपात खेळणार का? जसप्रीत बुमराह किती सामन्यासाठी उपलब्ध असणार? असे अनेक प्रश्न MI च्या संघासंदर्भात निर्माण झाले आहेत.