IPL 2026 साठी काही दिवसांपूर्वीच लिलाव पार पडला. प्रत्येक संघांनी आपापल्या ताफ्यात २५ खेळाडू दाखल करून घेतले. आता चाहत्यांना थेट स्पर्धेची आतुरता लागली आहे. पण त्याआधी एक गंभीर बाब चर्चेत आली आहे. भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालला अटक होण्याची शक्यता आहे. जयपूरमधील POCSO न्यायालयाने त्याचा २४ डिसेंबर २०२५ चा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. हा खटला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर आरोपांशी संबंधित आहे आणि पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यश दयालला कधीही अटक होण्याची शक्यता
जयपूर मेट्रोपॉलिटन फर्स्टच्या पोक्सो कोर्ट क्रमांक ३ च्या न्यायाधीश अलका बन्सल यांनी निकालात स्पष्टपणे म्हटले आहे की, उपलब्ध पुरावे आणि आतापर्यंतच्या तपासावरून असे दिसून येत नाही की आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. तपासात आरोपीची भूमिका उघड झाली आहे आणि त्याची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. यश दयालला आता लगेचच तुरुंगात जावे लागण्याची शक्यता कमी आहे, कारण त्याच्याकडे अजूनही उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. पण दरम्यान, बलात्कार प्रकरणात अडकलेला यश दयाल तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.
जुलै २०२५ मध्ये गुन्हा दाखल
२३ जुलै २०२५ रोजी, एका १९ वर्षीय महिलेने जयपूरमधील सांगानेर सदर पोलिस ठाण्यात यश दयालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तक्रारदाराचा दावा आहे की तिला क्रिकेटची आवड आहे. २०२३ मध्ये, जेव्हा ती १७ वर्षांची अल्पवयीन होती, तेव्हा यश दयालशी तिची भेट झाली. पीडितेने आरोप केला आहे की यशने क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचे आश्वासन देऊन तिचे भावनिक आणि शारीरिक शोषण केले. पहिली घटना २०२३ मध्ये घडली, जेव्हा यशने तिला जयपूरच्या सीतापुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचे म्हणणे आहे की हे दोन वर्षे हे सुरूच होते. त्यामुळे आता यश दयालला अटक होणार का हे पाहावे लागेल
आरसीबीने त्याला आयपीएल २०२६ साठी कायम ठेवले
यश दयाल मोठ्या वादात अडकला असेल, परंतु आरसीबी संघाने आयपीएल २०२६ साठी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ च्या आधी यश दयालला करारबद्ध केले होते. तो ५ कोटी रुपयांना संघात सामील झाला होता आणि गेल्या हंगामात संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. परिणामी, त्याला आयपीएल २०२६ साठी देखील कायम ठेवण्यात आले आहे.