Preity Zinta Punjab Kings Cooper Connolly BBL 2025-26: IPL 2026 साठीचा लिलाव १६ डिसेंबरला पार पडला. या लिलावात सर्व संघांनी आपले कसब पणाला लावत २५ खेळाडूंचा संघ पूर्ण केला. या लिलावात प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्सने (PBKS) ज्या खेळाडूवर विश्वास दाखवला, तो सध्या ऑस्ट्रेलियात आपल्या बॅटने दमदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियन युवा अष्टपैलू खेळाडू कूपर कॉनोली याने बिग बॅश लीग (BBL) २०२५-२६ मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कोनॉलीची तुफान फटकेबाजी
ब्रिस्बेन हीट विरुद्धच्या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सकडून खेळताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कॉनोलीने केवळ ३७ चेंडूत ७७ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट २०८ पेक्षा जास्त होता. विशेष म्हणजे, याआधीच्या सामन्यातही त्याने ३१ चेंडूत ५९ धावा कुटल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पर्थ स्कॉर्चर्सने २५७ धावांचा विशाल डोंगर उभा केला. त्याची ही खेळी पाहून प्रिती झिंटाचा पंजाब संघ नक्कीच आनंदात असणार आहे.
पंजाब किंग्ससाठी आनंदाची बातमी
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सने कॉनोलीला ३ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले आहे. लिलावानंतर लगेचच त्याने केलेल्या या तुफानी कामगिरीमुळे पंजाब किंग्सचा निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. कॉनोलीची फटकेबाज फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजी आगामी आयपीएल हंगामात पंजाबसाठी मोठी जमेची बाजू ठरू शकते.
फिन अँलनचीही फटकेबाजी
याच सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सचा सलामीवीर फिन अँलन यानेही ३८ चेंडूत ७९ धावांची स्फोटक खेळी केली. अँलनला आगामी आयपीएलसाठी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) खरेदी केले आहे. या दोघांच्या फटकेबाजीमुळे बिग बॅश लीगचा हा सामना प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरला.