IPL 2026 Player Trade Updates Sanju Samson officially joins CSK Ravindra Jadeja traded to RR : आयपीएल २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सर्वात मोठी आणि चर्चित ट्रेड डील पक्की झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला संजू सॅमसन आगामी हंगामात १८ कोटींसह चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. त्याच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील रवींद्र जडेजा आता राजस्थानच्या संघात सामील झाला आहे. पण जड्डूसाठी ही डील घाट्याची ठरल्याचे दिसते. कारण चेन्नई सुपर किंग्जने गत हंगामात त्याला १८ कोटी रुपयांसह आपल्या ताफ्यात कायम ठेवले होते. आता राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून त्याला १४ कोटी रुपये मिळणार आहेत.
जड्डू पुन्हा RR च्या ताफ्यात! ४ कोटी घाट्याचा सौदा, पण..
रवींद्र जडेजा याने २००८ मध्ये पहिल्या वहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाकडूनच IPL मध्ये पदार्पण केले होते. CSK कडून तब्बल १२ हंगाम खेळल्यानंतर आता तो पुन्हा राजस्थानच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. जड्डूनं आतापर्यंत आयपीएलमध्ये २५४ सामने खेळले आहेत. ट्रेड डीलचा भाग म्हणून त्याच्या करारातील लीग फीमध्ये बदल करण्यात आला आहे. जडेजाला यापुढे १८ कोटींऐवजी १४ कोटी रुपये मिळणार आहेत. पगार कपातीचा फटका बसल्यावर तो राजस्थान संघाचे नेतृत्व करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
संजू सॅमसनसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या रुपात मिळाला तिसरा संघ
संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सच्या संघातील प्रमुख खेळाडू आणि कर्णधार होता. १८ कोटी या पहिल्या किंमतीसह तो CSK च्या ताफ्यात सामील झाला आहे. आतापर्यंत त्याने १७७ सामने खेळले असून पहिल्यांदाच तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील त्याची ही तिसरा फ्रँचायझी संघ असेल. राजस्थान रॉयल्सशिवाय संजू सॅमसन २०१६ आणि २०१७ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळला होता.