IPL 2026 Player Trade Updates Mohammed Shami And Arjun Tendulkar Move To LSG : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाआधी या लोकप्रिय स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड झाला आहे. संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सामील झाला असून त्याच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहेत. या मोठ्या ट्रेडशिवाय काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादसह मुंबई इंडिन्स या दोन संघांनी संजीव गोयंका यांच्या मालकिच्या लखनौ सुपर जाएंट्ससोबत ट्रेड डील केली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळणारा अर्जुन तेंडुलकर लखनौच्या संघात सामील झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा 'लाला' अर्थात मोहम्मद शमी आणि सचिन तेंडुलकरचा 'लाला' पुढच्या हंगामात याच संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काव्या मारनच्या SRH संघानं शमीसाठी लखनौच्यासोबत किती कोटींची केली डील?
काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मेगा लिलावात मोहम्मद शमीसाठी १० कोटी रुपये मोजले होते. याच किंमतीसह तो आता लखनौच्या संघाकडून खेळताना दिसेल. २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून तो वेगवेगळ्या चार फ्रँचयाझी संघाकडून आयपीएलमध्ये ११९ सामने खेळला आहे. शमीनं गुजरात टायटन्सच्या संघाकडून या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केल्याचा रेकॉर्ड आहे. २०२३ च्या हंगामात १७ सामन्यात २८ विकेट्स घेत तो पर्पल कॅप विजेता ठरला होता. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीनंतर जलदगती गोलंदाजाला वर्षभरासाठी क्रिकेटपासून दूर रहावे लागले. परिणामी तो २०२४ च्या हंगामाला मुकला. गत हंगामात हैदराबादच्या संघाकडून कमबॅक करताना त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता.
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
अर्जुन तेंडुलकरला मिळाला नवा संघ
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ बदलून गोवा संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचाही आयपीएलमधील संघ बदलला आहे. मुंबई इंडियन्सकडून तो आता लखनौ संघात सामील झाला आहे. २०२१ पासून मुंबई इंडियन्सच्या संघासोबत असणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला २०२३ मध्ये आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. पण त्याला फारशी संधी मिळाली नाही. आता लखनौच्या संघाने ३० लाख रुपयांसह त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. या फ्रँचायझी संघाकडून तरी त्याचे करिअर बहरणार का? ते पाहण्याजोगे असेल.