MI vs KKR, Ajinkya Rahane Scores Fifty : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात IPL 2026 स्पर्धेतील १९ व्या हंगामातील दुसरा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिन ॲलनच्या साथीनं KKR च्या संघाला दमदार सुरुवात करुन दिल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर फिन ॲलन १७ चेंडूत ३७ धावांची उपयुक्त खेळी करून माघारी फिरल्यावर अजिंक्य रहाणेनं मैं हूं ना...शो दाखवून देत संघाचा डाव सावरला. अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक साजरे करत त्याने खास विक्रमही नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग दुसऱ्या हंगामात अर्धशतकासह सलामी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या सलामीच्या लढतीत विराट कोहलीनं नाबाद अर्धशतकासह सलग दुसऱ्या हंगामात अर्धशतकासह दमदार सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. तोच पॅटर्न कोलकाता नाईट रायडर्सकडून अजिंक्य राहणेनं कॉपी पेस्ट केला. २०२५ च्या सलामीच्या सामन्यात अजिंक्य रहाणे याने ईडन गार्डन्सच्या मैदानात आरसीबीविरुद्ध ३१ चेंडूत ५६ धावांची खेळी केली होती. यंदाच्या हंगामाची सुरुवातही त्याने अर्धशतकासह केली.
दुनिया हिला देंगे...! टी-२० मध्ये 'त्रिशतकी' टप्पा गाठत MI नं रचला इतिहास; पाक संघाचा रेकॉर्ड धोक्यात
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अर्धशतकासह खास विक्रम
अजिंक्य रहाणेनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीत ४० चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी साकारली. कोलकाता नाईट रायडर्सच्या कोणत्याही कर्णधाराने मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. मुंबईकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी अजूनही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेत आहे. आपल्या याच मेहनतीच्या जोरावर अनुभवी गड्याने IPL मध्ये यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी कायम ठेवल्याचा मुद्दा ही चांगलाच गाजला होता. या खेळीसह त्याने संघ व्यवस्थापनाने आपल्यावर ठेवलेला विश्वासही सार्थ ठरवला आहे.
अजिंक्य रहाणेनं आयपीएलमध्ये १९९ सामने खेळले असून ५ हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक आहे. आतापर्यंत त्याने ३४ अर्धशतके आणि २ शतकासह ५०९९ धावा केल्या आहेत.