नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२६च्या सत्रासाठी दोन मोठ्या फ्रँचायझी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्या अदलाबदलीची चर्चा सुरू आहे. परंतु, डेवाल्ड ब्रेव्हिसमुळे या करारामध्ये एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. राजस्थानचा संघ चेन्नईकडे जडेजासोबत ब्रेव्हिसचीही मागणी करत आहे, मात्र पाच वेळचा आयपीएल विजेता संघ यासाठी तयार नाही.
चेन्नईचे म्हणणे आहे की, ते अनुभवी अष्टपैलू खेळाडू जडेजाला राजस्थानकडे सोपविण्यास तयार आहेत. मात्र, ब्रेव्हिसबद्दल समझोता होणार नाही. जडेजा, सॅमसनला खरेदी करण्यासाठी त्यांच्या फ्रँचायझींनी प्रत्येकी १८-१८ कोटी रुपये खर्च केले आहेत. रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांची त्यांच्या सध्याच्या फ्रँचायझीमधील कहाणी सारखीच आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे २०१६ आणि २०१७ च्या सत्रात या दोन्ही फ्रँचायझींनी बंदी अनुभवली, ज्यामुळे जडेजा कोच्चीसाठी आणि सॅमसन दिल्लीसाठी खेळले. बंदी उठल्यावर दोघांनी आपापल्या फ्रँचायझीमध्ये पुनरागमन केले.
राजस्थानला ब्रेव्हिसमध्ये रस का?
दक्षिण आफ्रिकेचा उजव्या हाताचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस २०२५ च्या सत्रात चेन्नईच्या संघात सामील झाला. तो अधूनमधून लेग स्पिन गोलंदाजीही करतो. त्याला 'बेबी एबी' असेही म्हटले जाते.
मुंबईने त्याला २०२२ च्या सत्रात संघात घेतले होते. मात्र, मेगा लिलावाआधी त्याला रिलीज करण्यात आले. विशेष म्हणजे मेगा लिलावात ब्रेविस अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर चेन्नईने त्याला जखमी गुरजपनित सिंगच्या जागी ऐनवेळी संघात सामील केले.
त्याला फक्त सहा सामने खेळण्याची संधी मिळाली असली तरी, तो आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे छाप सोडण्यात यशस्वी ठरला. त्याने सहा डावांमध्ये ३७.५० च्या सरासरीने आणि १८० च्या प्रभावी स्ट्राइक रेटने २२५ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यंदाच्या सत्रात १३ चौकार आणि १७ षटकार मारले होते.