IPL 2026 Delhi Capitals won by 6 wkts vs Mumbai Indians : समीर रिझवीच्या ९० धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सला पराभूत केले. मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि रोहित शर्माच्या ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६२ धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल अवघ्या एका धावेवर परतल्यावर नितीश राणा खातेही न उघडता माघारी फिरला. संघ अडचणीत असताना इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या समीर रिझवीनं यंदाच्या हंगामातील सलग दुसरे आणि आयपीएलमधील तिसरे अर्धशतक झळकावत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्याचं अर्धशतक अन् हिटमॅन रोहितची उपयुक्त खेळी
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रायन रिकल्टनच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघाने अवघ्या १८ धावांवर पहिली विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या तिलक वर्माला मुकेश कुमारनं खातेही उघडू दिले नाही. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मानं अर्धशतकी भागीदारी रचत मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूत ५३ धावांची भागीदारी रचली. रोहित शर्मा २६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ३५ धावा करून परतल्यावर सूर्यकुमार यादवनं ३६ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात नमन धीर २८ (२१) सह मिचेल सँटनर १८ (१३) आणि कॉर्बिन बॉशच्या ४ चेंडूतील ११ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात १६२ धावा केल्या होत्या. दिल्लीच्या संघाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक २ तर लुंगी एनिगडी, अक्षर पटेल, विपराज निगम आणि टी. नटराजन याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
समीर रिझवीसह निसंकाची दमदार खेळी
या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्या दोन षटकात दोन विकेट्स गमावल्या. पथुम निसंका आणि समीर रिझवी यांनी ४९ चेंडूत ६६ धावांची खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. निसंका ३० चेंडूत ४४ धावा करून परतल्यावर समीर रिझवनं आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सलग तिसरे आणि यंदाच्या हंगामातील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. ५१ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने त्याने९० धावांची मॅच विनिंग खेळी केली. डेविड मिलर २१ (१८) आणि स्टब्स ३(४) या जोडीनं १९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर संघाचा विजय निश्चित केला. मुंबई इंडियन्सकडून दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.