इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियमावलीत मोठा बदल केला आहे. सामन्यादरम्यान बेंचवर बसणाऱ्या खेळाडूंच्या मैदानावरील वावराबाबत बीसीसीआयने आता कठोर भूमिका घेतली असून, अतिरिक्त खेळाडूंना मैदानाच्या प्लेइंग एरियामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मैदानावर खेळादरम्यान होणारी अनावश्यक गर्दी टाळणे आणि शिस्त राखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे समजते. या नवीन नियमामुळे आता सामन्यादरम्यान डगआउटमधील शिस्त अधिक कडक पाहायला मिळणार आहे.
बीसीसीआयने आयपीएलच्या नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, जे खेळाडू टीम शीटमधील भाग नसती, त्यांना आता मैदानाच्या खेळपट्टीच्या क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव प्रवेश करता येणार नाही. साधारणपणे आयपीएलच्या एका संघात २५ खेळाडू असतात. मात्र, आता यातील केवळ १६ खेळाडूंनाच मैदानात जाण्याची किंवा सीमारेषेजवळ थांबण्याची परवानगी असेल.
यापूर्वी अनेकदा संघाचे राखीव खेळाडू मैदानात पाणी नेण्यासाठी, बॅट बदलण्यासाठी किंवा प्रशिक्षकांचा संदेश पोहोचवण्यासाठी धावत जायचे. मात्र, आता अंतिम १६ खेळाडूंच्या यादीत नसलेल्या खेळाडूंना यापैकी कोणत्याही कामासाठी मैदानात पाऊल ठेवता येणार नाही. संघांना देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, ही जबाबदारी केवळ १६ जणांच्या यादीतील खेळाडूंनाच पार पाडावी लागेल.
- 'बिब्स' परिधान केलेले जास्तीत जास्त ५ खेळाडूच एका वेळी सीमारेषेच्या परिसरात वावरू शकतात.
- हे ५ खेळाडू चेंडू परत आणण्यासाठी किंवा पाणी देण्यासाठी तिथे उपस्थित राहू शकतात. मात्र, उर्वरित खेळाडूंनी 'डगआउट'मध्येच बसणे अनिवार्य आहे.
- राखीव खेळाडूंना सीमारेषा आणि एलईडी जाहिरात फलक यांच्यामधील मोकळ्या जागेत उभे राहण्यास किंवा फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयपीएल फ्रँचायझींनी या बदलांची पुष्टी केली आहे. "आम्हाला अलीकडेच बीसीसीआय कडून काही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, पर्यायी खेळाडूंना मैदानात मुक्तपणे फिरता येणार नाही. केवळ अधिकृत १६ खेळाडूच मैदानात आत बाहेर करण्यास पात्र असतील. उर्वरित खेळाडूंनी डगआउटमध्ये राहणे बंधनकारक आहे," असे एका फ्रँचायझी प्रतिनिधीने सांगितले.