Axar Patel Delhi Capitals IPL 2026: नुकताच IPLचा लिलाव पार पडल्यानंतर सर्वच संघांनी आगामी हंगामासाठी तयारीला सुरूवात केली आहे. यादरम्यान, दिल्ली कॅपिटल्स (DC) कॅम्पमध्ये एक मोठा बदल होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला कर्णधारपदावरून काढून टाकले आहे. मागील हंगामात, IPL 2025 मध्ये अक्षर संघाचा कर्णधार होता, परंतु आता तो केवळ खेळाडू म्हणून संघाचा भाग असेल. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व कुणाकडे असेल, याबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बदलणार
हा निर्णय फ्रँचायझीसाठी आश्चर्यचकित करणारा ठरू शकतो, कारण अक्षरने संघाला १४ सामन्यांपैकी सात विजय मिळवून दिले होते आणि २०२५ च्या हंगामात पाचवे स्थान मिळवून दिले होते. प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात संघ थोड्या फरकाने अपयशी ठरला होता. पण कदाचित याच कारणामुळे व्यवस्थापनाला नवीन दिशेने विचार करण्यास प्रवृत्त केले असावे. अक्षर हा संघाचा सर्वात उपयुक्त खेळाडूंपैकी एक राहील, परंतु नेतृत्वाची भूमिका आता दुसऱ्या खेळाडूकडे दिली जाईल.
दिल्ली कॅपिटल्स अनुभवावर विश्वास ठेवणार
मिळालेल्या वृत्तानुसार, अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल हा नवीन कर्णधार होण्यासाठी एक प्रबळ दावेदार आहे. राहुलकडे आधीच संघात वरिष्ठ पद आहे आणि त्याला पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स तसेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. फ्रँचायझी त्याला संघाचा कॅप्टन म्हणून नियुक्त करून संघाला नवीसंजीवनी देण्याचा विचार करत आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, राहुलचे नाव आघाडीवर आहे.
अक्षरला नुकतीच टीम इंडियामध्ये पदोन्नती
अक्षर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार नसला तरी, त्याला अलीकडेच टीम इंडियामध्ये बढती मिळाली आहे. बीसीसीआयने अक्षर पटेलची आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ साठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. हा निर्णय त्याच्या सातत्यपूर्ण फॉर्मच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. तो आधी संघाचा उपकर्णधार होता. पण मधल्या काळात शुबमन गिलला संघाचा उपकर्णधार करण्यात आले होते. त्याला फारशी चांगली छाप पाडता आली नाही. त्यामुळे गिलला संघाबाहेर काढण्यात आले आणि त्याजागी अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधारपद करण्यात आले.