Akash Ambani Mumbai Indians IPL 2026 Auction: मुंबई इंडियन्स हा संघ नेहमीच आपल्या दमदार खेळीसाठी आणि पडद्यामागच्या तंत्रशुद्ध नियोजनासाठी ओळखला जातो. यंदा मुंबईचा संघ लिलावात सर्वात कमी ३ कोटींपेक्षाही कमी पैसे घेऊन आला होता. लिलावाआधी मुंबईने ट्रेड डील करत तीन खेळाडूंना संघात दाखल करुन घेतले होते. त्यासोबत त्यांनी तब्बल १७ खेळाडूंना रिटेन केले. त्यामुळे लिलावात उतरताना त्यांच्याकडे फारसे पैसे शिल्लक नव्हते. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानी यांनी लिलावात एक कृती केली, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. त्या कृतीची पडद्यामागची गोष्ट त्यांनी लिलावादरम्यानच्या मुलाखतीत सांगितली.
त्याच्याविषयी मनात खूप आदर आहे...
यंदाचा लिलाव सुरु झाला आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन लिलावासाठी आला. त्याच्यावर २० कोटींपेक्षाही अधिकची बोली लागू शकते असा साऱ्यांनाच अंदाज होता. त्यामुळे मुंबईला हा खेळाडू मिळणे शक्य नव्हते. पण असे असूनही ग्रीनसाठी सर्वात पहिली बोली मुंबईने लावली. त्यानंतर बोली पुढे सुरू झाली आणि मुंबईने माघार घेतली. या कृतीबद्दल आकाश अंबानी यांनी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, "कॅमेरून ग्रीन हा उत्तम खेळाडू आहे. त्याला पहिल्यांदा आमच्या संघातूनच आम्ही IPL स्पर्धेत आणले. तो केवळ चांगला क्रिकेटरच नव्हे तर खूप चांगला माणूस आहे. त्याला आम्ही विकत घेऊ शकत नव्हतो याची पूर्ण कल्पना होती, पण त्याच्याविषयी आमच्या मनात आदर आहे. तो आदर दाखवण्यासाठीच आम्ही पहिली बोली लावली."
मुंबईच्या संघाने लिलावात कोणकोणते खेळाडू घेतले?
मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात मोठ्या रकमेचे खेळाडू विकत घेतले नाहीत. पण त्यांनी अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉकला १ कोटींच्या मूळ किमतीत संघात घेतले. त्यानंतर अथर्व अंकोलेकर या मुंबईकर मराठी मुलाला ३० लाखांच्या मूळ किमतीत ताफ्यात घेतले. तसेच, मोहम्मद इजहार आणि दानिश मालेवार या दोघांनाही ३० लाखांच्या मूळ किमतीत संघात सामील केले.
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू:
हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंज, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघू शर्मा
ट्रेड डील:
शार्दूल ठाकूर, शेरफेन रुदरफोर्ड आणि मयंक मार्कंडे
मुंबईने रिलीज केलेले खेळाडू:
बेवन जेकब्स, केएल श्रीजीत, विग्नेश पुथुर, कर्ण शर्मा, लिजाद विलियम्स, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान, रीस टॉप्ली