आयपीएल २०२६ च्या लिलावात पाचवेळा विजेत्या राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने सर्वांनाच थक्क केले आहे. अनुभवी खेळाडूंकडे कल असलेल्या चेन्नईने यावेळी दोन नवख्या देशांतर्गत खेळाडूंवर तब्बल २८.४० कोटी रुपयांचा वर्षाव केला आहे, यात युवा फलंदाज प्रशांत वीर आणि १९ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिक शर्मा यांचा समावेश आहे. कार्तिक शर्माला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी चेन्नईने १४.२० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली.
कार्तिक शर्माला आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारख्या मोठ्या संघांनी त्याला खरेदी करण्यासाठी जोर लावला होता. मात्र, चेन्नईने शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि अखेर त्याला १४.२० कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले.
कार्तिक शर्मा इतका खास का?
राजस्थानचा रहिवासी असलेल्या १९ वर्षीय कार्तिकने आपल्या खेळाने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने उत्तराखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी पदार्पणातच शानदार शतक ठोकून धमाका केला होता. गेल्या हंगामात राजस्थानकडून तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ८ डावांत ११८.०३ च्या स्ट्राईक रेटने ४४५ धावा कुटल्या. शेर-ए-पंजाब टी-२० स्पर्धेत त्याने १० डावांत १६८.०१ च्या स्ट्राईक रेटने ४५७ धावा केल्या आहेत.
चेन्नईसाठी का महत्त्वाचा?
चेन्नई सुपर किंग्जला मधल्या फळीत एका दमदार भारतीय फलंदाजाची आणि यष्टीरक्षकाची गरज होती. कार्तिक शर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत डावाला वेग देण्यास सक्षम आहे. धोनीच्या भविष्यातील वारसदाराच्या रूपात चेन्नई त्याच्याकडे पाहत असल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात आहे. कार्तिक व्यतिरिक्त चेन्नईने अष्टपैलू प्रशांत वीरला देखील १४.२० कोटींमध्ये खरेदी करून आपली टीम मजबूत केली आहे.