- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर)
यंदाच्या आयपीएलचे पहिले तीन आठवडे संपले आहेत आणि क्रिकेट वर्तुळात फक्त एकाच नावाचा सध्या बोलबाला आहे आणि तो म्हणजे वैभव सूर्यवंशीचा. मूळचा पाटण्याचा असलेल्या या खेळाडूने राजस्थानकडून खेळताना ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे, ती पाहून संपूर्ण क्रीडा विश्व अचंबित झाले आहे. केवळ १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करून त्याने आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, त्याने दोन अर्धशतके अवघ्या १५-१७ चेंडूंमध्ये पूर्ण केली असून, त्याचा स्ट्राईक रेट ३०० च्या वर आहे. ही आकडेवारी कोणत्याही जागतिक दर्जाच्या खेळाडूसाठी स्वप्नवत आहे.
तेंडुलकरप्रमाणेच मिळणार भारताला अनमोल हिराजेव्हा एखादा १५-१६ वर्षांचा खेळाडू मैदानात अशा प्रकारची प्रतिभा दाखवतो, तेव्हा साहजिकपणे त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाते. इतिहासात डोकावून पाहिले तर लक्षात येते की, जेव्हा सचिन बाद व्हायचा, तेव्हा चाहते टीव्ही बंद करायचे आणि तो फलंदाजीला आला की पुन्हा टीव्ही सुरू व्हायचे. हाच प्रभाव आता वैभवच्या बाबतीत निर्माण होताना दिसत आहे. सचिनने १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते, तर वैभव १५ व्या वर्षीच आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची धुलाई करत आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाजीची एक थोर परंपरा आहे. सुनील गावसकर निवृत्त झाल्यावर सचिन आला, सचिननंतर विराट कोहलीने ती धुरा सांभाळली आणि आता विराटाच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात वैभव सूर्यवंशीच्या रूपाने एक नवा वारसदार तयार होताना दिसत आहे. ही तुलना वैभववर दबाव वाढवू शकते. परंतु, त्याच्यातील गुणवत्ता पाहता हा दबाव पेलण्याची क्षमता त्याच्यात असल्याचे जाणवते.
कौशल्याचे पैलू आणि गुणवत्तेचे दर्शन१. वैभवची फलंदाजी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही, तर त्याच्याकडे असलेली नैसर्गिक गुणवत्ता अफाट आहे. त्याचा बॅट स्पीड आणि चेंडूचा टप्पा अचूक हेरण्याची क्षमता विलक्षण आहे. त्याचे पदलालित्य पाहून अनेक माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले आहेत.
२. विशेषतः मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहला ज्या सहजतेने पटकार लगावले, ते पाहून त्याच्यातील आत्मविश्वासाची खात्री पटते. तसेच बंगळुरूविरुद्ध जोश हेझलवूडसारख्या अनुभवी गोलंदाजाचा त्याने ज्या धैर्याने सामना केला, त्यावरून स्पष्ट होते की, तो मोठ्या व्यासपीठासाठी सज्ज आहे.
महानतेची व्याख्या आणि संयमाची गरजवैभवला लगेच महान ठरवण्याची घाई करणे चुकीचे ठरेल. भारतीय उपखंडात एखादी प्रतिभा दिसली की, आपण तिला लगेच महानतेच्या शिखरावर नेऊन बसवतो. पण, सचिन तेंडुलकर महान ठरला; कारण त्याने २४ वर्षे सातत्याने स्वतःला सिद्ध केले. वैभवकडे आक्रमक खेळी करण्याची कला आहे; पण त्याने केवळ टी-२० पुरते मर्यादित राहू नये. माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या मते, वैभवला थोडा वेळ देण्याची गरज आहे. घाईघाईत त्याला मोठ्या जबाबदाऱ्या देण्यापेक्षा त्याच्या खेळाला परिपक्व होऊ दिले पाहिजे. ज्या पद्धतीने त्याने आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे, ते पाहता भारतीय निवड समिती त्याच्या नावाचा टी-२० संघासाठी नक्कीच विचार करेल; पण त्याची खरी कसोटी ही कसोटी क्रिकेटमध्ये असेल.
भविष्याची वाटचाल आणि दिग्गजांचे मार्गदर्शनवैभवला भविष्यात एक महान खेळाडू बनायचे असेल, तर त्याने केवळ फ्रँचायझी क्रिकेटवर अवलंबून राहू नये. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांशी चर्चा करून त्याने आपल्या खेळातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांसारख्या परदेशी खेळाडूंकडूनही शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्याच्याकडे स्वतःचे स्थान निर्माण करण्याची अफाट क्षमता आहे. त्याने आक्रमक शैलीला संयमाची जोड दिली आणि कसोटी क्रिकेटमध्येही यश मिळवले, तर तो नक्कीच भारताचा पुढचा सुपरस्टार ठरेल. क्रिकेटमधील ही परंपरा पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठी वैभव सज्ज झाला आहे, फक्त त्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
Web Summary : Young Vaibhav Suryavanshi's explosive IPL debut sparks Sachin comparisons. His talent is undeniable, but patience and guidance are key. Experts emphasize the need for nurturing his talent across formats for long-term success.
Web Summary : युवा वैभव सूर्यवंशी के विस्फोटक आईपीएल डेब्यू ने सचिन से तुलना शुरू कर दी है। प्रतिभा निर्विवाद है, लेकिन धैर्य और मार्गदर्शन महत्वपूर्ण हैं। विशेषज्ञ दीर्घकालिक सफलता के लिए सभी प्रारूपों में प्रतिभा को निखारने की आवश्यकता पर जोर देते हैं।