Virat Kohli Dinesh Karthik Video Rajat Patidar, IPL 2025 RCB vs DC: एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाची दमदार घोडदौड सुरु असताना, दिल्ली कॅपिटल्सने त्यांना पराभवाची चव चाखायला भाग पाडले. महत्त्वाचा भाग म्हणजे बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले. या सामन्यानंतर विविध चर्चा होताना दिसल्या. दिनेश कार्तिकने पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले. पण त्यातच एका व्हायरल व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले. सामन्यादरम्यान विराट कोहली चांगलाच संतापल्याचे जाणवले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले. कोहली कर्णधार रजत पाटीदारच्या मैदानावरील काही निर्णयांवर नाखूश आहे. कोहलीने स्वतःची नाराजी मेन्टॉर दिनेश कार्तिककडे व्यक्त केली. दिल्लीच्या डावातील १६व्या षटकात विराट आणि कार्तिक यांच्यात आक्रमक संवाद झाला. कोहलीच्या मते, पाटीदार क्षेत्ररक्षण लावतेवेळी चुकीचे निर्णय घेत होता. वरिष्ठांचे मत विचारात घेत नव्हता.
नेमके काय घडले?
मैदानात घडलेल्या घटनांवरून असे दिसून आले की कोहलीला रजत पाटीदारचे काही निर्णय मान्य नव्हते. पंधराव्या षटकानंतर हा प्रकार घडला. रजत पाटीदारने लावलेली फिल्डिंग कोहलीला खटकली. परंतु पाटीदार विराटकडे लक्ष देत नव्हता. जोश हेजलवूडने २२ धावा दिल्यानंतर विराट अधिकच संतापला आणि मैदानाच्या बाहेर उभा असलेल्या कोच दिनेश कार्तिककडे जाऊन आक्रमकपणे त्याने स्वतःचा राग व्यक्त केला. याबाबत समालोचकदेखील बोलताना दिसले. अशा परिस्थितीत आता असा प्रश्न निर्माण होतो की नवा कर्णधार संघातील अनुभवी खेळाडूचे म्हणणे ऐकत नाही का, अशी सोशल मीडियावर चर्चा निर्माण झाली आहे.
दिनेश कार्तिक खेळपट्टीबाबत काय म्हणाला?
दिल्लीविरुद्ध पराभवानंतर माध्यमांशी बोलताना कार्तिक म्हणाला, "पहिल्या दोन सामन्यांत आम्ही चांगली खेळपट्टी बनविण्यास सांगितले; पण दोन्ही वेळा आव्हानात्मक खेळपट्टी मिळाली. आम्ही क्युरेटरशी चर्चा करू. ते आपले काम चोखपणे करतील, अशी आशा आहे. फलंदाजीला पूरक ठरेल अशी खेळपट्टी नव्हती. टी२०मध्ये चौकार आणि षटकारांना महत्त्व असते. हितधारकांचीही अशीच अपेक्षा असते. या प्रकारात अधिक धावा निघणे प्रसारक आणि चाहत्यांसाठी आनंददायी असते. सर्व जण चौकार-षट्कारांची आतषबाजी पाहू इच्छितात. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहून धावफलक हलता ठेवणे फलंदाजांसाठी कठीण झाले होते. मोठे फटके मारणेदेखील सोपे नसते. पण, टी-२०त अखेर फटकेबाजी करावीच लागते. अशावेळी विकेटदेखील गमवावी लागते."