इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना ऑरेंज आर्मीनं पॉवर प्लेमध्ये आघाडीच्या ४ विकेट्स गमावल्या. आयपीएलमध्ये १२ वर्षांनी त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. याआधी २०१३ च्या हंगामात त्यांच्यावर अशी बिकट वेळ आल्याचे पाहायला मिळाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१३ धावांत आघाडीचे ४ फलंदाज परतले तंबूत
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड या जोडीनं सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात केली. ट्रॅविस हेड चार चेंडूचा सामना करून खाते न उघडता माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला इशान किशनही चार चेंडूत एक धाव करून तंबूत परतला. त्याच्या पाठोपाठ ८ धावांची भर घालून अभिषेक शर्मानेही आपली विकेट गमावली. नितीश कुमारच्या रुपात संघाच्या धावफलकावर १३ धावा असताना हैदराबादच्या संघाने चौथी विकेट गमावली. याआधी २०१३ च्या हंगामात दोन वेळा SRH संघाने २० धावांच्या आत चार विकेट्स गमावल्या होत्या. यातील एक सामना ते राजस्थान रॉयल्स विरुद्ध तर दुसरा सामना त्यांनी पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध खेळला होता.
इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO)
पॉवर प्लेमध्ये चौथ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात ४ विकेट्स गमावल्यावर ६ षटकात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २४ धावा केल्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील पॉवर प्लेमधील त्यांची ही चौथी निच्चांकी धावसंख्या ठरली. २०२२ च्या हंगामात ३ बाद १४ धावा ही त्यांची आयपीएलमधील पॉवर प्लेमधील निच्चांकी धावंसख्या आहे.
क्लासेनसह अभिनव मनोहरमुळे टळली मोठी नामुष्की
आघाडीच्या विकेट्स गमावल्यावर हैदराबादचा संघ अडचणीत असताना आतापर्यंत अडखळत खेळणाऱ्या हेनरिच क्लासेन याने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ७१ धावांची दमदाह खेळी केली. त्याला अभिनव मनोहरनं ३७ चेंडूत ४३ धावा करत उत्तम साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारली.