Lucknow Super Giants Lord Shardul Thakur : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर शार्दुल ठाकूर याच्यासाठी यंदाची आयपीएल स्पर्धा एकदम खास आहे. कारण मेगा लिलावात 'अनसोल्ड'चा टॅग लागल्यानंतर त्याची अखेरच्या टप्प्यात LSG च्या ताफ्यात एन्ट्री झालीये. दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात संघात स्थान मिळाल्यावर त्याला पहिल्याच सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. त्याने आपल्यातील धमक आणि हिंमत दाखवून देत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात २ षटकात २ विकेट्स घेत यंदाच्या हंगामात 'लॉर्ड शो' दाखवण्यासाठी तयार आहे, याचे संकेत दिले आहेत. आता दुसऱ्या लढतीत त्याच्यासमोर SRH च्या ताफ्यातील स्फोटक फलंदाजीला लगाम लावण्याचे चॅलेंज असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जलवा, आता आयपीएल गाजवण्याची वेळ
शार्दुल ठाकूर हा बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पुन्हा टीम इंडियात कमबॅकसाठी शार्दुल ठाकूरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात धमक दाखवलीये. बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर पडण्याची वेळ आली तरी आयपीएल स्पर्धेनंतर इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यासाठी त्याचा विचार होईल, एवढी भारी कामगिरी त्याने निश्चितच केलीये. पण त्याआधी आता रंगबेरंगी जर्सीत तो आपला रंग दाखवण्यासाठी उत्सुक असेल.
Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डिकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्...
कडवे आव्हान असताना लॉर्ड शो दाखवण्याचे चॅलेंज
देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळल्यावर त्याचे फळ मिळतेच, हे शार्दुल ठाकूरने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दाखवून दिले. दिल्लीच्या ताफ्यातील जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल या आघाडीच्या फलंदाजांना त्याने पहिल्याच षटकात तंबूचा रस्ता दाखवला होता. अशीच दमदार कामगिरी तो सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा एक वेगळाच दबदबा आहे. ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा आणि इशान किशनसह हेन्री क्लासेन चौघडी प्रतिस्पर्धीत संघालील गोलंदाजांची घडीच बसू देत नाहीत. कोणत्याही गोलंदाजांप्रमाणे शार्दुल ठाकूरसाठीही हे कडवे आव्हान असेल. इथं लॉर्ड शो दाखवून तो आपल्या संघासाठी कितपत फायद्याचा ठरतो ते बघण्याजोगे असेल.
आयपीएलमध्ये कसा आहे शार्दुल ठाकूरचा रेकॉर्ड
आयपीएलमध्ये लखनौ संघाकडून खेळण्या आधी शार्दुल ठाकूर हा चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली आणि कोलकाता फ्रँचायझी कडून खेळला आहे. आतापर्यंत त्याने ९६ सामन्यात ९६ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत त्याच्या खात्यात एका अर्धशतकासह ३०७ धावा जमा आहेत. २०२१ च्या हंगामात चेन्नईच्या ताफ्यातून त्याने या स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी करताना २१ विकेट्स घेतल्या होत्या. पण त्यानंतर त्याचा आलेख घसरला. सध्याचा त्याचा फॉर्म बघता पुन्हा एकदा तो पिकला येईल अशी आशा आहे.