IPL 2025 Sunrisers Hyderabad Third Highest Total In Indian Premier League With 278 Runs Record Most 250-plus totals in T20s :सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या १८ व्या हंगामातील आपल्या अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारली. यंदाच्या हंगामाची सुरुवात ज्या झोकात केली होती तोच तोरा या संघाने अखेरच्या साखळी सामन्यातही दाखवला. ट्रॅविस हेड () याची स्फोटक फलंदाजी आणि त्यात क्लासेनच्या खेळीची पडलेली भर याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात २७८ धावा काढल्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. तिन्ही सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा सनरायझर्स हैदराबादच्या नावेच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या
गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ३ बाद २८७ धावसंख्येसह आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध निर्धारित २० षटकात ६ बाद २८६ धावा केल्या होत्या. तगडी बॅटिंग ऑर्डर असल्यामुळे हा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ३०० धावसंख्या उभारण्याचा डाव साधेल, अशी चर्चा रंगली होती. शेवटच्या सामन्यातही हेड आणि क्लासेन यांनी त्यासाठी जोर लावला पण शेवटी संघाला २७८ धावांपर्यंतच मजल मारता आली.
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
हेडनं अर्धशतकानंतर क्लासेनचं नाबाद शतक, संघाचं त्रिशतक हुकलं, पण...
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेडनं आक्रमक अंदाजात डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३७ चेंडूत ९२ धावांची भागीदारी रचली. अभिषेक शर्मा १६ चेंडूत ३२ धावा करून परतल्यावर क्लासेन याने ट्रॅविस हेडची पार्टी जॉईन केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ८३ धावा कुटल्या. ट्रॅविस हेड ४० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकार मारून ७६ धावा करून बाद झाला. मग क्लासेन याने इशान किशनसोबत आणखी एक मोठी भागीदारी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. यात इशान किशनने २९ धावांचे योगदान दिले. क्लासेन ३९ चेंडूत ७ चौकार आणि ९ षटकार मारत नाबाद १०५ धावा केल्या. अनिकेत वर्मानं ६ चेंडूत नाबाद १२ धावांचे योगदान दिले. SRH च्या संघाचे त्रिशतक हुकले असले तरी २७८ धावांसह टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २५० पेक्षा अधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉ़र्ड सनरायझर्स हैदराबादच्या संघाने अधिक भक्कम केलाय.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २५० पेक्षा अधिक धावा करणारे संघ
- सनरायझर्स हैदराबाद- ५ वेळा
- भारतीय संघ- ३ वेळा
- सरे- ३ वेळा