अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात काल (शुक्रवारी, २२ मे) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौने गुजरातचा ३३ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल हा लखनौचा कर्णधार ऋषभ पंतकडे दुर्लक्ष करताना कॅमेऱ्यात कैद झाला. मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.
गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. परंतु, शुभमन गिल आणि ऋषभ पंत एकमेकांच्या समोर आले असता वेगळच दृश्य पाहायला मिळाले. व्हिडीओत, पंत गिलशी हस्तांदोलन करताना काहीतरी बोलत आहे तर, गिल पटकन पुढे निघून गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरत आहे. शुभमन गिलने मुद्दाम पंतकडे दुर्लक्ष केले, असा दावा लखनौचे चाहते करत आहेत. तर, दोन भारतीय संघातील खेळाडूंमधील मैत्रीपूर्ण गंमत होती, असे स्पष्टीकरण गुजरातच्या चाहत्यांनी दिले.
लखनौचा संघ गुजरातवर पडला भारीलखनौ सुपर जायंट्स हा एकमेव संघ आहे, ज्याने या हंगामात गुजरात टायटन्सला दोनदा हरवले. या हंगामात गुजरातने ४ सामने गमावले आहेत, त्यापैकी एकट्या एलएसजीने २ वेळा गिलच्या संघाला पराभूत केले. आता लखनौचा शेवटचा लीग सामना २७ मे रोजी आरसीबीसोबत होणार आहे.
भारताचा इंग्लंड दौराआयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. या मालिकेत शुभमन गिलवर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर, ऋषभ पंत विकेटकीपर फलंदाज म्हणून संघासोबत असेल, अशा बातम्या येत आहेत.