आयपीएलच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू ठरलेल्या श्रेयस अय्यरनं यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पैसा वसूल कमागिरीचा नजराणा पेश केला. त्याने अहमदाबादच्या मैदानातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या कारकिर्दीतील ९७ धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याला आयपीएलच्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावण्याची संधी होती. पण अखेरच्या षटकात त्याला स्ट्राइकच मिळाले नाही. दुसऱ्या बाजूला शशांकनं तुफान फटकेबाजी करत कॅप्टनच्या शतकाशिवाय संघाच्या धावफलकावर मोठी धावसंख्या उभारण्याला प्राधान्य दिले. पंजाबच्या संघानं निर्धारित २० षटकात ५ बाद २४३ धावा करत गुजरात टायटन्ससमोर २४४ धावांचे टार्गेट सेट केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अय्यर ९७ धावांवर नाबाद, शशांकनं १६ चेंडूत कुटल्या ४४ धावा
अहमदबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून शुबमन गिलनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग या जोडीनं पंजाबच्या डावाची सुरुवात केली. प्रभसिमरन सिंग अवघ्या ५ धावा करून माघारी फिरल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरनं सलामीवीर युवा प्रियांशच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी रचली. प्रियांश २३ चेंडूत ४७ धावा करून परतल्यावर अय्यरने आपली फटकेबाजी एकाबाजूनं सुरुच ठेवली. अखेरच्या षटकात शशांक सिंगनं १६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४४ धावा करत संघाच्या धावफलक २४३ धावा लावल्या. दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर ४२ चेंड़ूत ५ चौकार आणि ९ षटकाराच्या मदतीने ९७ धावांवर नाबाद राहिला. ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही ठरली.
मध्यफळीतील फलंदाजांनी नांगी टाकली, पण अखेरच्या फटकेबाजीमुळं पंजाबनं मोठी धावसंख्या गाठली
गुजरातच्या संघाकडून साई किशोर हा सर्वात य़शस्वी गोलंदाज ठरला. त्याने अझमतुल्लाह ओमरझाई १६ (१५), ग्लेन मॅक्सवेल ० (१) आणि स्टॉयनिस २० (१५) यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. याशिवाय राशिद खान आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. मध्यफळीतील फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर अखेरच्या टप्प्यात शशांकनं केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे पंजाब किंग्जच्या संघानं घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सच्या संघासमोर मोठ टार्गेट सेट केले आहे.