Ishan Kishan Sunrisers Hyderabad Player to Watch, IPL 2025 RR vs SRH: इशान किशन हे नाव घेतलं की साऱ्यांना आठवतो तो मुंबई इंडियन्सचा संघ. इशानला मुंबईच्या संघाने क्रिकेटमध्ये मोठं केलं आणि नाव मिळवून दिलं. तुफानी सलामीवीर म्हणून तो मुंबईच्या ताफ्यात आला. त्याने विकेटकिपिंग आणि फलंदाजी करत साऱ्यांची मनं जिंकली. पण गेल्या दीड-दोन वर्षात त्याचं नशीब त्याच्यावर रुसलं. बीसीसीआय आणि किशनमध्ये वाद झाले. टीम इंडियात त्याला फारशी संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सने त्याला संघातून करारमुक्त केले. अशा परिस्थितीत सनरायजर्स हैदराबादने त्याला संघात घेतलंय. टीम इंडियात 'कमबॅक' करायचा असेल तर त्याला यंदाच्या हंगामात तगडी कामगिरी करावीच लागणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष असेल.
'बिग हिटर्स'च्या संघात निभाव लागेल?
सनरायजर्स हैदराबाद हा धडाकेबाज फलंदाजांची फौज असलेला संघ आहे. IPL मध्ये सर्वोच्च धावसंख्या गाठण्याचे विविध रेकॉर्ड्स याच संघाच्या नावावर आहेत. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा हे दोन सलामीवीर आणि खतरनाक हिंटिंग करणारा विकेटकिपर हेनरिक क्लासेन हे तिघे हैदराबादचे स्टार फलंदाज आहेत. इशान किशनला या संघात केवळ सलामीवीर किंवा केवळ किपर म्हणून जागा मिळवणे निव्वळ अशक्य आहे. कारण हैदराबादने या तिघांनी मोठी रक्कम देऊन संघात कायम ठेवले आहे. अभिनव मनोहरही संघात आहे. मॅच फिनिशर म्हणून नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स असे अनुभवी खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर येऊन फटकेबाजीचा भार सांभाळणं ही जबाबदारी त्याच्यावर असेल.
'करो या मरो'चा हंगाम
इशान किशन मुंबई इंडियन्सच्या संघात खेळताना किपर म्हणून संघात कायम होता. त्याला पर्याय म्हणून ओपनर क्विंटन डी कॉक आला त्यानंतर हळूहळू इशान किशनची संघात जागा डळमळीत झाली. अखेर मुंबईने त्याला सोडचिठ्ठी दिली. हैदराबादच्या संघात तुफान फटकेबाजी करणारे अनेक फलंदाज आहेत. किपिंगची जबाबदारीही क्लासेन सांभाळेल याची संघाला खात्री आहे. त्यामुळे इशान किशनला फलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध करावीच लागेल. त्यातही पहिल्या काही सामन्यांतच त्याला आपला 'इम्पॅक्ट' दाखवावा लागेल. कारण जर तो काही कारणाने संघाबाहेर झाला, तर त्याला पुन्हा प्लेइंग ११ मध्ये जागा मिळणे कठीण होईल आणि परिणामी त्याचा टीम इंडियातील कमबॅकही लांबवणीवर पडेल.