आयपीएलच्या १८ व्या हंगामातील प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण श्रेयस अय्यरचा हा निर्णय स्पर्धेतून बाद झालेल्या राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. पंजाबच्या संघाला पॉवर प्लेमध्येच त्यांनी धक्क्यावर धक्के दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेहाल वढेरानं क्लास फिफ्टीसह सावरला संघाचा डाव
प्रियांश आर्य ९ (७) आणि प्रभसिमरन सिंग २१ (१०) ही जोडी स्वस्तात माघारी फिरली. दोघांना तुषार देशपांडेनं तंबूचा रस्ता दाखवला. पंजाबकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मिचेल वोवेन याला खातेही उघडता आले नाही. त्याला क्वेना माफाकाने बाद केले. संघ अडचणीत असताना नेहाल वढेरानं संघाचा डाव सावरला. त्याने २५ चेंडूत यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावले. याआधीचे अर्धशतकही त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातच झळकावले होते.
प्रीतीनंही दिली दाद
पंजाबच्या संघाने ३४ धावांवर पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर नेहाल वढेरा याने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अय्यर २५ चेंडूत माघारी फिरल्यावर नेहल वढेरानं आपला तोरा कायम ठेवला. त्याने अर्धशतक साजरे केल्यावर स्टँडमध्ये उपस्थितीत पंजाब संघाची सह संघमालकीण प्रीती झिंटाने त्याच्या या दमदार खेळीला दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
शतकाची संधी होती, पण...
नेहाल वढेरा ज्या तोऱ्यात खेळत होता ते पाहता तो या सामन्यात शतकी खेळीचा डाव साधेल असे वाटत होते. पण १६ व्या षटकात एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. आकाश मधवालने त्याच्या क्लास इनिंगला ब्रेक लावला. नेहल वढेरा याने या सामन्यात ३७ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ७० धावांची खेळी केली.