IPL 2025 RR vs PBKS 59th Match Player to Watch Vaibhav Suryavanshi Batter Than Riyan Parag For Rajasthan Royals :आयपीएलच्या १८ व्या हंगामासाठी संघ बांधणी केल्यापासून राजस्थान रॉयल्सचा संघ युवा १४ वर्षांच्या पोरामुळे चर्चेत राहिला. या पोराला पदार्पणाची संधी मिळाली अन् त्यानं मैफिलही लुटली. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी रॉयल काही ठरलं असेल तर ते म्हणजे वैभव सूर्यंवशीचं पदार्पण. या पोरानं ऐतिहासिक शतकी खेळीसह राजस्थान रॉयल्स संघाकडून नवा इतिहास रचला. ही गोष्ट सोडली तर राजस्थान रॉयल्ससाठी हा हंगाम काही चांगला गेला नाही. यात कॅप्टन्सी बदलाचाही मोठा फटका राजस्थानला बसल्याचे पाहायला मिळाले. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग संघाचा कर्णधार म्हणून मिरवताना दिसले. पण त्याला ना बॅटिंगमध्ये धमक दाखवता आली ना कर्णधाराच्या रुपात तो छाप सोडू शकला. परिणामी राजस्थान रॉयल्सच्या संघाचा स्पर्धेतील प्रवास हा प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारण्याआधीच संपुष्टात आलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्याच्यासाठी १४ कोटी मोजले तो फुसका बार ठरला
राजस्थान रॉयल्सच्या (RR) संघाने रियान परागसाठी १४ कोटी एवढी मोठी रक्कम मोजली. संजूच्या अनुपस्थितीत त्याला नेतृत्वाची संधी मिळाली. पण तो कॅप्टन्सीसह फलंदाजीत फ्लॉप ठरला. मध्यफळीत संघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी चोख बजवण्यात तो कमी पडला. पहिल्या ११ डावात ३१.३३ च्या सरासरीसह त्याने २८२ धावा केल्या होत्या. ज्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. सगळं संपल्यावर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाविरुद्ध त्याच्या भात्यातून ४५ चेंडूत ९५ धावांची खेळी आली. त्याची ही कामगिरी पाहिल्यावर त्याच्यापेक्षा १४ वर्षांचे पोराचा रुबाब भारी होता, असेच म्हणावे लागेल.
अनुभवी रियान परागपेक्षा भारी खेळला वैभव
१४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला यंदाच्या हंगामात ५ सामन्यात संधी मिळाली. यात त्याने २०९.४६ च्या स्ट्राइक रेटनं १५५ धावा करताना एक दमदार शतकही झळकावल्याचे पाहायला मिळाले. सरासरीच्या तुलनेत तो रियान परागच्या किंचित मागे असला तरी पहिल्यांदा आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत त्याने जो तोरा दाखवला तो रियान पराग पेक्षा कित्येक पटीने भारी होता. वैभवची रियानसोबत तुलना करण्यामागच कारण हेच की, संजूच्या अनुपस्थितीत त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. पण तो १४ वर्षांच्या पोरानं जी धमक दाखवली तसाही खेळ करू शकला नाही.