आयपीएलच्या आपल्या अखेरच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत यंदाच्या हंगामाची सांगता विजयासह केली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात टॉस जिंकल्यावर संजू सॅमसन याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानने १७ चेंडू आणि ६ विकेट्स राखून विजय नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेन्नई सुपर किंग्जकडून आयुष म्हात्रे टॉपर
पहिल्यांदा फलंदाजी करताना आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉन्वे या जोडीनं चेन्नई सुपर किंग्जच्या डावाची सुरुवात केली. कॉन्वे अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या उर्विल पटेल याला खातेही उघडता आले नाही. या दोन्ही विकेट्स युधवीर सिंग याने घेतल्या. एका बाजूला ठराविक अंतराने विकेट पडत असताना आयुष म्हात्रेनं २० चेंडूत ४३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय डेवॉल्ड ब्रेविस याने २५ चेंडूत केलेल्या ४२ धावा आणि शिवम दुबेच्या ३२ चेंडूतील ३९ धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने १८७ धावांपर्यंत मजल मारली होती. राजस्थानकडून आकाश मधवाल आणि युधवीर सिंग या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय तुषार देशपांडे आणि हसरंगाला १-१ विकेट मिळाली.
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
धावांचा पाठलाग करताना वैभव अन् संजूसह यशस्वीनं दाखवला क्लास
चेन्नई सुपर किंग्जनं दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि युवा वैभव सूर्यंवशी या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. यशस्वी जैस्वाल १९ चेंडूत ३६ धावांची उपयुक्त खेळी करून तंबूत परतल्यावर वैभव सूर्यंवशी आणि कर्णधार संजू सॅमसन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचत सामना राजस्थानच्या बाजूनं सेट केला. संजू सॅमसन ३१ चेंडूत ४१ धावा करून माघारी फिरल्यावर त्यापाठोपाठ वैभव सूर्यंवशी ३३ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेलनं १२ चेंडूत ३१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला हेटमायरने ५ चेंडूत १२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.