IPL 2025 RR vs CSK 11th Match Player to Watch Tushar Deshpande Rajasthan Royals : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ११ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ गुवाहाटीच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मैदानात उतरणार आहे. मागील तीन हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना क्रिकेट कारकिर्दीला एक्स्प्रेस गतीनं पुढे घेऊन जाणारा मुंबईकर तुषार देशपांडे या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 'कल्याण' साधण्यासाठी धावताना दिसेल. ज्या ताफ्यातून खेळताना आयपीएल कारकिर्द बहली त्या संघाविरुद्ध खेळताना तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून भेदक मारा करत चर्चेत आलेला चेहरा
मुंबईतील कल्याणच्या तुषार देशपांडे याने २०१८-१९ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना १५ विकेट्स घेत संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. याच हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेतील ५ सामन्यात १७ विकेट्स घेत त्याने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली अन् तो प्रकाश झोतात आला.
IPL 2025 : तसा तो धोनीचा गाववाला! पण महाराष्ट्राचा चेहरा होऊन झालाय CSK चा 'शिलेदार'
आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, पण..
२०२० च्या हंगामात दिल्ली फ्रँचायझी संघानं २० लाख या मूळ किंमतीसह त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. पण या हंगामात मिळालेल्या ५ सामन्यात त्याच्या खात्यात फक्त ३ विकेट्सच जमा झाल्या. २०२२ च्या हंगामातील लिलावाआधी दिल्लीच्या संघानं त्याला रिलीज केले.
चेन्नईत गेला अन् एक्स्प्रेसच्या गतीप्रमाणे सुसाट वेगानं धावला
२०२२ च्या हंगामत चेन्नईच्या ताफ्यात सामील झाल्यावर त्याने २ सामन्यात फक्त ७ षटके टाकताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. पण २०२३ च्या हंगामात त्याने खरा वेग पकडला. या हंगामातील १६ सामन्यात त्याने २१ विकेट्स घेत आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी नोंदवली. चेन्नईच्या संघानं या हंगामातील विजेतेपदासह सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या मुंबई इंडियन्सच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. यात तुषार देशपांडेनं मोलाचा वाटा उचलला होता. या हंगामात तो पर्पल कॅपच्या शर्यतीत होता. पण गुजरात टायटन्सकडून २८ विकेट्ससह मोहम्मद शमीनं यात फायनल बाजी मारली होती. गत हंगामात १३ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या. या हंगामात त्याने आयपीएल कारकिर्दीत २७ धावा खर्च करत ४ विकेट्स ही सर्वोच्च कामगिरीही नोंदवल्याचे पाहायला मिळाले. आता राजस्थान रॉयल्सकडून ही कामगिरी सुधारुण आणखी नव्या शिखरावर पोहचण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.
आयपीएलमधील कामगिरी
तुषार देशपांडे याने २०२० च्या हंगामापासून आतापर्यंत ४० सामने खेळले असून त्याच्या खात्यात ४८ विकेट्स जमा आहेत. ज्या संघातून कारकिर्द बहरली त्या संघाविरुद्ध जर त्याने २ विकेट्स घेतल्या तर तो या स्पर्धेत ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण करेल. आपल्या जुन्या फ्रँचायझी संघाविरुद्ध खेळताना तो खास अर्धशतकी डाव साधणार का ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 RR vs CSK 11th Match Lokmat Player to Watch Tushar Deshpande Rajasthan Royals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.