मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी मुंबईच्या संघाला एक इशारा दिला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी समोर असताना प्रत्येक पाऊल खूप काळजीपूर्वक टाकावे लागते, असे त्याचे मत आहे. दोन्ही संघामध्ये रविवारी खेळला जाणारा सामना रोमहर्षक ठरेल, असाही रोहितने विश्वास व्यक्त केला आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे रोहित शर्मा आणि धोनी आपापल्या संघांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याआधी रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, धोनीच्या नेतृत्वाखालील संघाविरुद्ध जेव्हा तुम्ही विजय मिळवता, तेव्हा कसे वाटते? यावर रोहित म्हणाला की, धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेविरुद्ध खेळताना त्यांना हलक्यात घेऊ शकत नाही. धोनी कर्णधार असताना समोरच्या संघाला सामना जिंकणे जवळपास कठीण असते.
पुढे रोहित म्हणाला की, 'धोनीला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने इतके सामने जिंकल्यानंतर विरोधी संघ म्हणून आरामात बसू शकत नाही. तुमचा संघ गुणतालिकेत त्यांच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे. पण तुमच्या समोर धोनी असल्यास परिस्थिती पूर्ण वेगळी असते. त्यामुळे संघावर दबाव असतो. धोनी त्याच्या हातातून खेळ सहजासहजी सामना निसटू देत नाही. तिथे तुम्हाला काहीतरी करावे लागेल. चेन्नईविरुद्ध खेळताना तुम्हाला २० ओव्हर मैदानात उभे राहावे लागेल आणि फिल्डिंगमध्ये चपळता दाखवावी लागेल. तरच तुम्ही खेळ जिंकू शकाल.'
आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ तळाशी आहे. तर, मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघामध्ये झालेल्या गेल्या १० सामन्यात चेन्नईचा संघ वरचढ असल्याचे दिसून आले. यातील सात सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला. चेन्नईने गेल्या चार सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला आहे. जर आज धोनी आणि त्याच्या संघाने मुंबईला हरवले तर हा त्यांचा या मुंबईविरुद्ध सलग पाचवा विजय असेल.