मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली. बीसीसीआयने कर्णधार ऋषभ पंत आणि लखनौच्या सर्व खेळाडूंना दंड ठोठावला आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला स्लो ओव्हर रेटमुळे हा दंड ठोठावण्यात आला. या हंगामात लखनौला दुसऱ्यांदा धीम्या गतीने गोलंदाजी केली. त्यामुळे कर्णधारासह संघातील सर्व खेळाडूंकडून दंड ठोठावण्यात आला.
आयपीएलद्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,'मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रविवारी सामना खेळला गेला. या सामन्यात लखनौच्या संघाने धीम्या गतीने गोलंदाजी केली. यामुळे लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावण्यात आला. या हंगामात दुसऱ्यांदा लखनौच्या संघाने धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे ऋषभ पंतकडून २४ लाख आणि इम्पॅक्ट प्लेअरसह संघातील प्लेईंग इलेव्हनचा भाग असलेल्या खेळाडूंकडून सहा लाख किंवा त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के रक्कम दंड आकारण्यात येईल.'
ऋषभ पंतची निराशाजनक कामगिरीआयपीएल २०२५ मध्ये लखनौकडून खेळताना ऋषभ पंतला काही खास कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या मेगा लिलावात लखनौने ऋषभ पंतला २७ कोटीत खरेदी केले. संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु, तो अपयशी ठरला. मुंबई विरुद्ध सामन्यात तो अवघ्या चार धावांत बाद होऊन माघारी परतला. ऋषभ पंतने १० सामन्यांत फक्त ११० धावा केल्या आहेत.
गुणतालिकेत सहाव्या स्थानावरगुणतालिकेत लखनौचा संघ सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यात पाच वेळा पराभव स्वीकारला आहे. प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी लखनौला पुढील चारही सामने जिंकणे आवश्यक आहेत.