आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यामध्ये रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा ११ धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामात आरसीबीचा बंगळुरूच्या घरच्या मैदानावर मिळवेला हा पहिला विजय ठरला. दरम्यान, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ भक्कम स्थितीत होता. मात्र त्यावेळी सामन्यातील निर्णायक क्षणी बंगळुरूचा अनुभवी खेळाडू विराट कोहली याने केलेली एक कृती सामन्याला कलाटणी देऊन गेली.
त्याचं झालं असं की, २०६ धावांच्या आव्हानाचा पाठकाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने यशस्वी जयसवाल याच्यासह इतर फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अवघ्या १३ षटकांमध्ये ३ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरच्या ७ षटकांत त्यांना ७४ धावांची गरज होती. अशा परिस्थितीत सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने कर्णधार रजत पाटीदार याला एक इशारा दिला आणि त्यानंतर राजस्थानचा डाव कोलमडला. विराटने दिलेला हा चतूर सल्ला बंगळुरूसाठी मास्टरस्ट्रोक ठरला.
या सामन्यात फलंदाजीत चमक दाखवताना ७० धावांची खेळी करून बंगळुरूला दोनशेपार मजल मारून देणाऱ्या विराटने संघ संकटात असताना आपल्या चतुर रणनीतीचीही चुणूक दाखवली. त्याने दव पडत असल्याने चेंडूला मदत मिळत नसल्याचे सांगत तेराव्या षटकात कर्णधार रजत पाटीदार याला चेंडू बदलून घेण्यास सांगितले. तसेच चेंडू बदलल्यावर त्याला चांगली पकड मिळेल. तेव्हा क्रृणाल पांड्या ड्याला गोलंदाजीसाठी घेऊन ये असा सल्लाही कर्णधार रजत पाटीदार याला दिला. विराटने दिलेल्या सल्ल्यानुसार चेंडू बदलला गेला. तसेच इथून सामन्यानेही कूस बदलली. गोलंदाजीसाठी आलेल्या क्रृणाल पांड्याने नितीश राणा याला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजीला भगदाड पाडण्याचं काम जोश हेझलवूडने केलं. त्यामुळे चेंडू बदलल्यानंतर पुढच्या ७ षटकांता राजस्थानला केवळ ६२ धावाच जमवता आल्या आणि त्यांना ११ धावांनी पराभूत व्हावे लागले.